Breaking News

‘डॉ. तात्या लहाने ... अंगार ... पॉवर इज विदीन’ चित्रपट 10 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

मुंबई, दि. 22, सप्टेंबर - डॉ. तात्या लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देणारा आणि त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा डॉ. तात्या लहाने ...  अंगार... पॉवर इज विदीन हा चित्रपट विराग मधुमालती एंटरटेनमेंट निर्मित असून तो प्रेक्षकांच्या भेटीस 10 नोव्हेंबरला येत आहे. या चित्रपटाच्या अनुषंगाने चला  हवा येऊद्या च्या सेटवर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मकरंद अनासपुरे, अलका कुबल, निशिगंधा वाड, साधना सरगम, भारत गणेशपुरे, विराग  मधुमालती वानखडे, वंदना वानखेडे व स्वतः डॉ. तात्या लहाने उपस्थित होते.
या निमित्ताने डॉ. तात्या लहानेनी आपल्या आठवणींना उजाळा दिला व त्यावेळी ते म्हणाले आज मी जिवंत आहे आणि जे आज मी दिवस पाहतोय ते माझ्या आई  मुळेच. जर माझ्या आईनी मला तिची किडनी दिली नसती तर मी आजचे हे दिवस पाहू शकलो नसतो. प्रत्येकाची आई आपल्या मुलाला एकदाच जन्म देते पण  माझ्या आईनी मला दोनदा जन्म दिला आहे. डॉक्टर पुढे म्हणाले की डॉक्टरकी हा व्यवसाय नसून ती एक सेवा आहे त्यामुळे डॉक्टरांनी डॉक्टरकी पेशाला व्यवसाय  न समजता ती एक सेवा समजून काम केले पाहिजे, तसेच ते पुढे म्हणाले की आपल्या देशात रक्तदानचा प्रसार झाला आहे पण अजून ही अवयव दानाकडे गांभीर्याने  घेतले जात नाही. आज आपल्या देशात अवयवदानाची नितांत गरज असूनसुद्धा अवयव दानाचे प्रमाण बाहेरच्या देशापेक्षा आपल्या देशात कमी आहे. आपण  सगळ्यांनी जागरुक होऊन अवयवदान करून गरजू जनतेचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करावे व त्यांना नवे जीवन द्यावे, असे आवाहन ही त्यांनी केले.