Breaking News

पतंजली एजन्सी डिलरशीपचे आमिष दाखवून लुटणारी टोळी गजाआड

अहमदनगर, दि. 21, सप्टेंबर - पतंजलीच्या उत्पादनाच्या डिलरशीपचं आमिष दाखवून लुटणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आलं आहे. बिहारमधून टोळीचा  म्होरक्या राघवेंद्र सिंग उर्फ विकास कुमारला अटक करण्यात आली आहे. 28 तारखेपर्यंत भामट्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बनावट आधार कार्ड,  पॅनकार्ड, बनावट बँक खात्यासह 91 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीत राघवेंद्रच्या खात्यात देशातील विविध ठिकाणाहून 50 लाख जमा  झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर संदीप कुमार, संतोष कुमार आणि अमित कुमार या तिघा साथीदारांचा तपास सुरु आहे.
राहुरीच्या देविदास दहिफळे यांनी पतंजलीच्या बनावट वेबसाईट वर फॉर्म भरला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात टोल फ्री क्रमांकावर राघवेंद्रशी संपर्क साधला होता.  त्यावेळी पंजाब नॅशनल बँकेत डिपॉजिटसह तीन लाख रुपये जमा केले होते. दहिफळे यांना मेलवर पतंजली डिलरशीपचं प्रमाणपत्र पाठवण्यात आलं. त्यानंतर  मालासाठी दहा लाखाची मागणी केली. मात्र  संशय बळावल्यानं दहिफळे यांनी चौकशी केली असता त्यांना फसवणूक झाल्याचं उघड झालं.