Breaking News

विदर्भात अजूनही पाऊसची प्रतिक्षा

नागपूर, दि. 21, सप्टेंबर - राजधानी मुंबईसह राज्यभरात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील धरणांमध्ये  मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र विदर्भाची तहान अजूनही भागलेली नाही. कारण विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये अजून दुष्काळसदृष परिस्थिती आहे.
पावसाळा संपत आला तरी वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी धरणाने अजून तळ गाठलेला आहे. सध्या या धरणात फक्त 21 टक्के पाणीसाठा आहे. तर यवतमाळ  जिल्ह्यातील इसापूर धरणाचीही हीच परिस्थिती आहे. इसापूर धरणावर विदर्भ मराठवाड्यातील 1 लाख 25 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येते. पण यंदा इथे  फक्त 10 टक्के पाणीसाठा आहे.
विदर्भाकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे इथले सर्वच सिंचन प्रकल्प तहानलेले आहेत. त्यामुळेच ऐन पावसाळ्यात बुलडाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ  जिल्ह्यांना 15 दिवसआड पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव सिंचन मंडळाने सरकारला पाठवल्याची माहिती आहे.