Breaking News

खा . नाना पटोले भाजप मधून बाहेर पडणार ?

मुंबई, दि. 25, सप्टेंबर - भंडारा - गोंदियाचे खासदार नाना पटोले हे भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत . पक्षाकडून आपली  हकालपट्टी व्हावी जेणेकरून आपली खासदारकी दीड वर्षे शाबीत राहील असे प्रयत्न खा . पटोले यांच्याकडून चालू आहेत . त्या साठीच ते सातत्याने पक्षाच्या  नेतृत्वाविरोधात सातत्याने वक्तव्ये करीत असल्याचे सांगण्यात येत आहे . नवी दिल्लीत कालपासून सुरु झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला  ते उपस्थित राहिलेले नाहीत. आपण आपल्या मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या पूर्वनियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहिलो असून त्यामुळे राष्ट्रीय  कार्यकारिणी बैठकीला गेलेलो नाही असे खा. पटोले यांच्याकडून सांगण्यात आले . पक्षाकडून आपल्याला अनुपस्थितीबद्दल खुलासा विचारण्यात आला तर आपण तो  देऊ असेही त्यांनी अकोला येथे आज पत्रकारांशी बोलताना सांगितले . अकोल्यात आज शेतकरी जागर मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना खा. पटोले  यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला . ’ अदानी - अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींच्या भल्यासाठी मोदी सरकार काम करत असून या सरकारला  शेतकर्‍यांच्या समस्यांचे काहीच देणे घेणे नाही असा हल्ला खा. पटोले यांनी या कार्यक्रमात बोलताना चढवला . 2009 मध्ये त्यावेळच्या काँग्रेस - राष्ट्रवादी सरकारवर  टीका करत खा. पटोले यांनी भारतीय जनता पक्षाचा रस्ता धरला होता. आताही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होईल असे संकेतही खा. पटोले यांनी या कार्यक्रमात  बोलताना दिले . काही दिवसांपूर्वी नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना खा. पटोले यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका  केली होती. आपण खासदारांच्या बैठकीत शेतकर्‍यांचा मुदा उपस्थित केल्याने पंतप्रधान मोदी संतापले होते , असे पटोले म्हणाले होते .
पक्षविरोधी वक्तव्यांचे कारण देत भाजप कडून आपली हकालपट्टी झाली तर आपली खासदारकी वाचेल असा खा . पटोले यांचा अंदाज आहे . अन्यथा त्यांना  खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.