Breaking News

फायनान्स कंपनीकडून कोरेगाव येथील सिमेंट व्यापार्‍याची फसवणूक

कोरेगाव, दि. 25 (प्रतिनिधी) : व्यवसायवृध्दीसाठी एक कोटी रुपयांचे तातडीने कर्ज देण्याचे अमिष दाखवून, त्यासाठी प्रोसेसिंग फीच्या नावाखाली 3 लाख रुपये  उकळून फसवणूक करणार्‍या पुण्यातील उमरजी फायनान्सच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये कंपनीचे संचालक,  व्यवस्थापक, चार्टर्ड अकौटंट, अ‍ॅडव्होकेटसह दोन स्थानिक एजंटांचा समावेश आहे.
योगेश भीमराव जगदाळे यांचा कोरेगाव परिसरात सिमेंट विक्रीचा व्यवसाय असून, ते जिल्ह्यातील मोठे सिमेंट वाहतूकदार आहेत. त्यांना आपला व्यवसाय वाढवायचा  असल्याने त्यांनी कर्ज प्रकरणासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु केली होती. त्याचवेळी त्यांची महेश बनपट्टे (तम्मा मिस्त्री) व नितीन सुर्यकांत पवार यांच्याशी भेट  झाली. त्यातून ओळख वाढत गेली आणि दोघांनी पुण्यातील उमरजी फायनान्सकडून एक कोटी रुपयांचे कर्ज तातडीने मिळवून देण्याचे अमिष दाखविले. सातारा  जिल्ह्यासह पुण्यातील अनेक व्यावसायिकांनी कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले असून, तुम्ही निश्िंचत रहा, असा सल्ला त्यांनी दिला होता. दोघांनी जगदाळे यांना  पुण्यातील कंपनीच्या कार्यालयात त्यांची बडदास्त ठेवण्यात आली. तेथे झालेल्या चर्चेनुसार जगदाळे यांनी कागदपत्रे सादर केली, ती पाहून तुमचे कर्जप्रकरण मंजूर  होईल, तुम्ही 3 लाख रुपये प्रोसेसिंग फी भरण्यास सांगण्यात आले.
जगदाळे यांनी उमरजी यांच्या नावे पुण्यातील जनता सहकारी बँकेच्या मार्केट यार्ड शाखेतील खात्यावर मार्च महिन्यात वेळोवेळी रकमांचा भरणा केला. 3 लाख रुपये  जमा झाल्यानंतर कंपनीचे चार्टर्ड अकौटंट परिमल भावे व अ‍ॅड. माने हे दोघे जगदाळे यांच्या मालकीची शेतीची पाहणी करण्यासाठी आले. त्यांनी पाहणी करुन  व्हिजीट फी म्हणून 10 हजार रुपये जगदाळे यांच्याकडून घेतले. पुण्यात गेल्यावर दोन दिवसातच तुमचा रिपोर्ट कंपनीला पाठवतो, असे त्यांनी सांगितले.
योगेश जगदाळे यांनी वारंवार कंपनीच्या कार्यालयात व कंपनीशी संबंधित असलेल्या व्यवस्थापक व एजंटांशी संपर्क साधला, मात्र सर्वांनी सातत्याने टोलवाटोलवी  केली. दरवेळेस 8 ते 10 दिवसात कर्ज प्रकरण मंजूर होईल, तुम्ही निर्धास्त रहा, असे त्यांना बजावण्यात आले. सप्टेंबर महिन्यापर्यंत जगदाळे यांनी वेळोवेळी  कंपनीचे संचालक मिलिंद उमरजी, व्यवस्थापक दिनकर वालगुडे, कोरेगावातील एजंट नितीन पवार व महेश बनपट्टे (तम्मा मिस्त्री) यांच्याकडे कर्ज प्रकरणाबाबत  विचारणा, मात्र नेहमीची उत्तरे ऐकून वैतागलेल्या जगदाळे यांनी अखेरीस पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी सहा जणांविरोधात फसवणुकीचा  गुन्हा दाखल केला आहे. हवालदार शंकरराव गायकवाड तपास करत आहेत.