Breaking News

नागपुरात इंटर मॉडेल स्टेशन उभारण्यासाठी पूर्ण सहकार्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

नागपूर, दि. 23, सप्टेंबर - नागपुरातील अजनी येथे इंटर मॉडल स्टेशन व खापरी येथे मल्टी मॉडल लॉजिस्टीक पार्क उभारण्याबाबत दोन्ही प्रकल्पाचे येत्या  डिसेंबरपर्यंत नियोजन पूर्ण करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण व महाराष्ट्र मेट्रो महामंडळाने काम सुरू करावे. राज्य शासनातर्फे सर्व प्रकारचे सहकार्य  करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण व महाराष्ट्र मेट्रो रेल्वे महामंडळ यांच्या संयुक्त  विद्यमाने अजनी येथे इंटर मॉडल स्टेशन तसेच खापरी येथे मल्टी मॉडल लॉजिस्टीक पार्क उभारण्याबाबतचे सादरीकरण करण्यात आले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री  नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. विकास महात्मे, आ. सुधाकर कोहळे, प्रा.अनिल सोले, प्रा.जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, मल्लिकार्जून रेड्डी,  जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्रचे सभापती डॉ.दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त अश्‍विन मुदगल तसेच महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे ब्रिजेश दिक्षीत, राष्ट्रीय महामार्ग  विकास प्राधीकरणाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अजनी येथे जागतिक दर्जाचे इंटर मॉडेल स्टेशनची निर्मिती करताना रेल्वे, मेट्रो तसेच बस यासोबतच प्रवासांसाठी आवश्यक सर्व सुविधा असलेले अत्याधुनिक मॉडेल  स्टेशनची निर्मिती करतांना रेल्वे परिसरातील जागा तसेच राज्य शासनातर्फे आवश्यक जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. मॉडेल स्टेशनचे नियोजन येत्या तीन  महिन्यात पूर्ण करण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अधिकार्‍यांची समन्वय समिती गठीत करण्याची सूचना करतांना इंटर मॉडेल स्टेशनचे भूमीपूजन व  प्रत्यक्ष कामाला सुरुवात मार्चपर्यंत होईल यादृष्टीने नियोजन करण्याचा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिल्या.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अजनी येथे जागतिक दर्जाचे मॉडेल स्टेशनचे आराखडा तयार करताना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होतील. तसेच येत्या  25 वर्षाची गरज ओळखून त्यादृष्टीने वास्तूकलेतील अत्युतकृष्ट जागतिक दर्जाचे मॉडेल उभे राहील याची खबरदारी घ्या. तसेच लँड स्केपींग गार्डन तसेच वाणिज्य  वापरा संदर्भात वापर याबाबत प्रामुख्याने विचार करुन देशातील सर्वोत्कृष्ठ मॉडेल स्टेशन ठरेल. अजनी मॉडेल स्टेशनसाठी 50 एकर जागेची आवश्यकता असून या  प्रकल्पाच्या प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यासोबत खापरी येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टीक पार्कसाठी राज्य शासनातर्फे जमीन उपलब्ध करुन देण्यात येणार  असल्यामुळे सर्वोत्कृष्ठ लॉजिस्टीक पार्क उभा राहील, असा विश्‍वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे पुणे मेट्रो तसेच नागपूर मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील काम सुरु असून या कामासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ  अधिकार्‍यांच्या बैठकीत आढावा घेतला. पुणे येथील मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामासंदर्भात स्वारगेट येथे इंटीग्रेटेट मेट्रो स्टेशन, मेट्रोचे बांधकाम करताना भूमिगत रेल्वे  बांधकाम तसेच शहरातील विविध भागात मेट्रो सोबत दळणवळणाचा अधिक चांगल्या सुविधा कशा निर्माण करता येतील यासंदर्भात महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे  ब्रिजेश दीक्षित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
पुणे येथील मेट्रोचे बांधकाम करताना पुणे मेट्रो स्टेशन अधिक आकर्षक तसेच व्यावसायिक वापरासोबतच प्रवासांच्या सुविधांवर अधिक भर देवून वाहतूक सुरळीत  होऊन प्रवासाचा वेळ अधिक कमी कसा करता येईल यावर भर देण्याचा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्‍यांना दिल्यात. मेट्रो रेल्वेचे नियोजन करताना  सोलरचा वापर तसेच पर्यावरणपूरक इमारतींची निर्मिती यावर अधिक भर देण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील कामाला गती मिळाली असून  दुसर्‍या टप्प्यात खापरी ते बुटीबोरी टोमॅटीव्ह चौक ते कामठी तसेच ऑऊटर रिंगरोड वाडी आदी भागातील विस्तारासंदर्भात यावेळी सादरीकरण करण्यात आले.  टोमॅटीव्ह चौक ते कामठी 9.6 कि.मी., वासुदेव नगर ते वाडी 5 कि.मी., लोकमान्य नगर ते हिंगणा 3 कि.मी. प्रजापती नगर ते कापसी 5 कि.मी. तसेच खापरी ते  बुटीबोरी हे 13 कि.मी. अशा 35.6 कि.मी. लांबीच्या मेट्रो प्रकल्पासाठी 9 हजार 256 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.