Breaking News

भारतीयत्वाचा प्रचार, प्रसार व्हावा, जैन मुनी विद्यासागर महाराज यांचे आवाहन

नागपूर,, दि. 23, सप्टेंबर - जगाला आमच्या प्राचीन संस्कृतीचे महत्त्व कळावे, यासाठी भारतीयत्वाचा प्रचार- प्रसार करण्यात यावा, असे आवाहन जैन मुनी  आचार्य विद्यासागर महाराज यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केले.
रामटेक येथील ऐतिहासिक शांतीनाथ दिगम्बर जैन मंदिरामध्ये सध्या संयम स्वर्ण महोत्सव सुरू आहे. आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांच्या दीक्षा घेण्याला  2017-18 मध्ये 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संयम स्वर्ण महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. आज या पावनपर्वावर नागपूर येथील आपल्या पहिल्या भेटीत  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रामटेक येथे जैन मंदिराला भेट दिली. सर्वप्रथम त्यांनी या मंदिरापुढे चातुर्मासानिमित्त उभारण्यात आलेल्या सभामंडपात आचार्य  विद्यासागरजी यांना श्रध्दापूर्वक श्रीफळ अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अनेक जैन मुनी तसेच जैन समाजातील मान्यवर व शाळकरी मुले मोठ्या संख्येने  उपस्थित होती.
त्यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी येथील प्राचीन जैन मंदिराला भेट दिली. या मंदिरात 12-13 व्या शतकातील जैन धर्मातील 16 वे तीर्थंकर 1008 भगवान शांतीनाथ  यांची 13.5 फूट उंचीची मूर्ती आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी,  नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामटेकचे आमदार माल्लिकार्जुन रेड्डी आदींनी यावेळी भगवान श्री शांतीनाथ यांचे दर्शन घेतले.
यावेळी मांदिराच्या मागील बाजूस असलेल्या खासगी कक्षात जैन समाजाचे आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी राष्ट्रपतींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या  देशाची ओळख ही भारत या प्राचीन नावाने आहे. त्यामुळे भारत या नावालाच सार्वत्रिक अधिष्ठान मिळावे. भारतियत्वाची ओळख अर्थात आपल्या संस्कृती व  सभ्यतेची ओळख देशाच्या प्रत्येक नागरिकाला व जगाला व्हावी, यासाठी धोरण ठरावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्त्री शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार, प्रसार आणि  जगातील अनेक देशांप्रमाणे भारतात देखील मातृभाषेतून शिक्षणासाठी केंद्र सरकारने आग्रही असावे, खादीचा पुरस्कार करून स्वदेशीला चालना द्यावी, असेही त्यांनी  या चर्चेत सांगितले. यावेळी राष्ट्रपती महोदयांना मंदिरात हातमागावर तयार करण्यात आलेला कोट आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.