Breaking News

रयत क्रांती संघटनेवर अ‍ॅड. शार्दुल सुधाकरराव जाधव यांची निवड

पुणे, दि. 23, सप्टेंबर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर केलेल्या रयत क्रांती संघटनेच्या राज्य युवा आघाडी अध्यक्षपदी  पुण्यातील न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल सुधाकरराव जाधव यांची नियुक्ती झाली आहे. शाहू सांस्कृतिक हॉल, कोल्हापूर येथे  झालेल्या या कार्यक्रमात सदाभाऊ खोत, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी संघटनेचा झेंडा, बिल्ला याचे अनावरण  करुन कार्यकर्त्यांना शपथ देण्यात आली. अतिशय कमी वयात युवा संसद या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना राजकारणात आणण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील  असतात. त्यामुळे राज्यभरातील ग्रामीण भागातील युवकांशी अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांची नाळ जोडलेली आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य करीत  जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विविध संस्थांचे काम उत्तमरित्या सुरु ठेवले आहे. त्यांच्या संकल्पनेतून या शैक्षणिक संस्थामध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले  जात आहेत. यासोबतच राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांमध्ये देखील ते सक्रीय आहेत.