Breaking News

पिंपरी महापालिकेने दिलेले अनुदानाचे चेक ’बाउन्स’

पुणे, दि. 22, सप्टेंबर - पिंपरी चिंचवड महापालिकेने ’सीएनजी कीट’ बसविलेल्या शहरातील ऑटो रिक्षा परवाना धारकांना अनुदान वाटप केले होते. मात्र, रिक्षा  चालकांचे 16 लाख रुपयांचे धनादेश ’बाउन्स’ झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पर्यावरण अधिकार्‍याने हात झटकले असून लेखा विभागाने दिलेले धनादेश  आम्ही वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे रिक्षा चालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्यासाठी हा अनुदान वाटपाचा उपक्रम राबविला गेला होता. शहरात ’सीएनजी कीट’ बसविलेल्या 333  परवानाधारक ऑटो रिक्षा चालकांना महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते अनुदानाचे धनादेश वितरण करण्यात आले. महापालिकेने बँक ऑफ बडोदाचे धनादेश दिले.  रिक्षा चालकांनी ते धनादेश खात्यावर भरल्यानंतर ते धनादेश ’बाउन्स’ होवू लागले आहेत. महापालिकेच्या खात्यामध्ये अपुरा निधी असल्याने हे धनादेश ’बाउन्स’  झाल्याचे कारण बँकेकडून देण्यात येत आहे. याबाबत रिक्षा चालकांनी संताप व्यक्त केला आहे.
’सीएनजी कीट’ बसविल्याचे एकूण 1 हजार 270 अर्ज प्राप्त झाले होते. तर पात्र ठरलेल्या 986 जणांपैकी 653 रिक्षा चालकांना पहिल्या दोन टप्प्यात अनुदान  वाटप केले. उर्वरित 284 रिक्षा परवानाधारकांनी प्रलंबित कागदपत्रे सादर केल्यानंतर आणि आरटीओकडून तपासणी यादी प्राप्त झाल्यानंतर अनुदान वाटप होणार  आहे. याबाबत बोलताना पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले की, आम्हाला लेखा विभागाने दिलेले धनादेश आम्ही वाटप केलेले आहेत.  यात आमचा काहीही संबंध नाही. याबाबत रिक्षा चालकांच्या आमच्याकडे कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत.