म्यानमार सीमारेषेवर लष्कराच्या कारवाईत दहशतवादी ठार
नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - भारतीय लष्कराने भारत - म्यानमार सीमा रेषेवर केलेल्या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला. ठार झालेला दहशतवादी हा एनएससीएन (के) या संघटनेचा सदस्य होता. या कारवाईत एक भारतीय जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच लष्कराने आज सकाळी 7.30 च्या दरम्यान दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. यात एक दहशतवादी ठार झाला असून काही दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. लष्कराने घटनास्थळावरून एक एके 56 आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. शोध मोहिम अद्यापही सुरू असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.