Breaking News

रोटरी क्लबतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा गौरव

रत्नागिरी, दि. 04, सप्टेंबर - सार्वजनिक गणेशोत्सवाला सव्वाशे वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून रत्नागिरीच्या रोटरी क्लबने रत्नागिरीतील सार्वजनिक  गणेशोत्सव मंडळांचा गौरव केला. यावेळी बाळ गंगाधर टिळकांची वेशभूषा केलेल्या शौनक मनोज मुळ्ये या विद्यार्थ्याच्या हस्ते गणेशोत्सव मंडळांना मानपत्र प्रदान  करण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने रोटरी क्लबने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार उत्तम काम करणार्‍या गणेशोत्सव  मंडळांना भेट देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. रत्नागिरी ही लोकमान्य टिळकांनी जन्मभूमी आहे. रत्नागिरी शहराला लोकमान्य टिळकांच्या जाज्वल्य आणि  पुरोगामी विचारांचा वारसा लाभला आहे. टिळकांनी दिलेला सार्वजनिक गणेशोत्सवाचा हा वारसा त्याच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने नेण्यासाठी रत्नागिरीतील सार्वजनिक  गणेशोत्सव मंडळे कार्यशील असतात. अशा काही मंडळांचा हा कौतुक सोहळा प्रत्यक्ष मंडळाच्या गणपती उत्सवात रोटरी क्लबच्या सदस्यांकडून करण्यात आला.  रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे त्यांच्यासोबत टिळकांच्या रूपातील ’बाल’ टिळकांनी मंडळांना भेट दिली. रत्नागिरीकर मंडळांनी घेतलेला  सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा टिळकांच्या रत्नागिरीत योग्यरीतीने सुरू राहावा आणि भावी पिढ्यांना टिळकांच्या मनातील सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना  समजावी या हेतूने हा अभिनव प्रयोग करण्यात आला.
रोटरी क्लबचे सदस्य आणि नगराध्यक्ष राहुल पंडित आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष नीलेश मुळ्ये यांच्या संकल्पनेतून निघालेल्या या उपक्रमात रोटरी क्लबने उत्तम  काम करणार्‍या मंडळांचा मानपत्र देऊन सत्कार केला. यावेळी शौनक मनोज मुळ्ये याने बाळ गंगाधर टिळकांच्या वेषात टिळकांच्या संकल्पनेतील गणेशोत्सव  थोडक्यात विशद केला. यावेळी रोटरीच्या सचिव वेदा मुकादम, धरमसी चौहान, दिलीप रेडकर, रूपेश पेडणेकर, सचिन मुकादम उपस्थित होते.