Breaking News

श्री सप्तशृंग गडावर नवरात्र उत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ

नाशिक, दि. 22, सप्टेंबर - हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंग निवासिनी देवीची नवरात्र  उत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे.
आज पहाटेपासून विविध धार्मिक पूजा-अर्चासह महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चोख सुरक्षा व्यवस्था व सेवा - सुविधेच्या माध्यमातून  देवस्थान कर्मचारी व प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी कार्यरत असून, यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी  संघटनांनी हातभार लावलेला आहे.
सकाळची पंचामृत महापूजा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. या वेळी संस्थानचे अध्यक्ष तथा अति. सत्र  न्यायाधीश, श्रीमती यू.एम नंदेश्‍वर, विश्‍वस्त राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. रावसाहेब शिंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी ट्रस्टच्या अन्नपूर्णा प्रसादालयात 8 ते10 हजार भाविकांनी प्रसादालयात मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला. यात्रा उत्सव दरम्यान 2 वेळचे मोफत  अन्नदान (महाप्रसाद) सुविधा उपलब्ध करण्यात आली असून येणार्‍या भाविक भक्तांच्या सेवा-सुविधेसाठी 24 तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे.
न्यासाच्या परिसरात 3 ठिकाणी भाविकांची कुठल्याही पद्धतीने गैरसोय व चुकाचूक होवू नये त्या दृष्टीने उदभोदन कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून एकूण 67  सी सी टी व्ही कॅमेरे बसविन्यात आले असून 95 सुरक्षारक्षक व 5 बंदूकधारी सुरक्षारक्षक व महाराष्ट्र राज्य पोलीस, राज्य गृहरक्षक दलाचे कर्मचारी व अधिकारी वर्ग  लक्ष ठेवून आहेत.
ऐनवेळी उदभवणार्‍या आपत्तीसाठी 24 तास अग्निबंब सुविधा व प्रथोमपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहे. न्यासाच्यावतीने सर्व भाविकांसाठी अल्पदरात  निवास व्यवस्था व आवश्यक ठिकाणी एकूण 11 पाणपोया व 24 तास लॉकर, चप्पल स्टँडची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सर्वत्र महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ व न्यासाचे एकूण 5 जनरेटरद्वारे अखंडित विद्युत पुरवठा ठेवण्यात येणार असून संपूर्ण गड परिसर स्वच्छतेसाठी 60 कर्मचारी  नेमणूक करण्यात आलेली आहे.
यात्रा दरम्यान पूर्णतः खाजगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. भाविकांसाठी 225 बसेस प्रवाशांना नांदुरी येथून ने आण करणार आहेत. सप्तशृंगगडापासून एक  किलो मीटर अंतरावर तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे.
या नवरात्र उत्सव यात्रा यशस्वीतेसाठी न्यासाचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे मनिष कानडे  आदींसह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी वर्ग, तसेच प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग प्रयत्नशील आहेत.
सप्तशृंगगडावर व परिसरात आग लागून कुठलीही जीवित अथवा वित्त हानी होऊ नये म्हणून 24 तास अग्निशमन बंबाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भगवती  मंदिरामध्ये जवळपास 1000 महिलांनी घटस्थापना केली आहे.
मा.जिल्हाधिकारी यांनी केलेल्या प्लास्टिक मुक्त सप्तश्रुंगगड या संकलपनेला पर्यावरणाचा रास टाळण्यासाठी भाविकानी हात भार लावावा असे आवाहन करण्यात येत  आहे. व्यवस्थापक, सुदर्शन दहातोंडे