Breaking News

दीड लाखाची गोवा बनावटीची चोरटी दारू वाहून नेणार्‍या टेम्पोचालकाला अटक

सावंतवाडी, दि. 23, सप्टेंबर - गोव्याहून मिरजकडे जाणार्‍या टेम्पोचा पाठलाग करत दोडामार्ग पोलिसांनी आज दीड लाखाच्या दारूसह चार लाख 75 रुपयांचा  मुद्देमाल ताब्यात घेतला. दोडामार्ग-बांदा मार्गावरील सासोली येथे त्यांनी कारवाई केली. दीड लाखाच्या गोवा बनावटीच्या दारूसह तीन लाख पंचवीस हजार रुपये  किमतीचा दारू वाहतूक करणारा 407 टेम्पोही ताब्यात घेतला. या प्रकरणी टेम्पो चालक व मालक प्रकाश भगवान शिंदे (रा. खंडेराजुरी, ता. मिरज, जि. सांगली)  याला अटक करण्यात आली.
वाहतूक पोलीस राजा राणे, पोलीस कर्मचारी अनिल पाटील, हिरण नाईक व सचिन माने यांनी ही कारवाई केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश शिंदे 407  टेम्पो घेऊन गोव्याहून दोडामार्गच्या गांधी चौकात आले असता श्री. राणे यांनी त्यांना थांबण्याची सूचना केली. पण त्याने टेम्पो न थांबवता बांद्याच्या दिशेने वळवून  तो सुसाट पळवला. त्यामुळे श्री. राणे यांना संशय आला. त्यांच्यासह श्री. पाटील, श्री. नाईक आणि श्री. माने यांनी दोन दुचाकीच्या सहाय्याने त्या टेम्पोचा पाठलाग  केला आणि त्याला सासोली घाटीच्या पायथ्याशी अडवले. टेम्पोतील मागच्या भागाची पाहणी केली असता त्यांना गोवा बनावटीच्या दारूचे पंचवीस बॉक्स आढळले.  त्यांनी तात्काळ टेम्पो पोलीस ठाण्याच्या आवारात आणला. शिंदे यांच्या मालकीचा तो टेम्पो (एमएच 10 -ट 7606) आहे. पेडणे (गोवा) येथे एका कुटुंबाचे घरगुती  सामान घेऊन ते आले होते. परत जाताना पेडणे येथून पत्रादेवीतून बांदा मार्गे न जाता त्यांनी पेडणेतून म्हापसामार्गे दोडामार्ग गाठले. पण तिलारी घाटमार्गे न जाता  त्यांनी पुन्हा बांदामार्गे जाण्याचा निर्णय घेतला. वाहतूक पोलीस राजा राणे यांनी थांबण्याची सूचना करूनही न थांबल्याने अखेर ते पोलिसांच्या जाळ्यात अलगद  अडकले.