Breaking News

महाराष्ट्र सर्वार्थाने आदर्श राज्य - राष्ट्रपती

नागपूर, दि. 23, सप्टेंबर - राष्ट्रपती झाल्यानंतर 21 ऑगस्ट रोजी पहिला प्रवास लेह-लडाखचा केला. डोकलांम विवादाच्या पार्श्‍वभूमीवर देशाचे संरक्षण करणार्‍या  जवानांना भेटणे आवश्यक होते. त्यानंतर महाराष्ट्रात आपला पहिला प्रवास आहे. विविध काळात आणि विविध क्षेत्रात महाराष्ट्राने अनेक कर्तबगार माणसे दिली आहेत.  त्यामुळे गुणवंतांची खाण असलेले हे राज्य सर्वार्थाने आदर्श असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. नागपुरातील सुरेश भट सभागृहाच्या लोकार्पण  सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर  बावनकुळे, महापौर नंदा जिचकार प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रपती म्हणाले की, या राज्याचा इतिहास, योगदान शब्दांत मांडणे कठीण आहे. केवळ इथल्या महापुरुषांची नावे जरी घ्यायची म्हंटली तरी त्याला मर्यादा नाही.  शिवाजी महाराज, छत्रपती शाहू, समर्थ रामदास, तात्या टोपे, संत एकनाथ, ज्ञानेश्‍वर, तुकाराम, जोतिबा आणि सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई ,गोपाळ कृष्ण  गोखले, बाळ गंगाधर टिळक, डॉ. आंबेडकर, डॉ. केशव बळीराम हेडगेवार, आचार्य विनोबा भावे, यशवंतराव चव्हाण आणि बाबा आमटेंपर्यत विविध नेतृत्वाचे प्रवाह  इथल्या भूमीतुन प्रवाहित होतात. सामाजिक परिवर्तन आणि स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचे अतुलनीय योगदान आहे. स्त्री शिक्षण आणि दलितोत्थान यात महाराष्ट्र  अग्रेसर राहिला आहे. नागपुरात दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि शांतिनाथ जैन मंदिरात जाण्याची संधी मिळाली त्याचा विशेष आनंद वाटतो. अत्यंत अल्पावधीत देशाची  शक्ती स्थाने पाहता आली. याशिवाय महात्मा गांधींच्या चले जाव आंदोलनाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रोवली गेली. तसेच नागपूर विभागातील वर्धा गांधींनी आपली  कर्मभूमी बनवली होती, असे कोविंद म्हणाले.
यासोबतच कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्राने दिलेले योगदान वादातीत आहे. लावणीपासून ते मुंबईतील चित्रपटसृष्टी पर्यंतचा महाराष्ट्राचा सांस्कृतिक  प्रवास नेत्रदीपक आहे. तंत्रज्ञानाची कास धरून महाराष्ट्राने शिक्षण व सांस्कृतिक वारसा जपावा. पोलियोमुळे पायाला अधुपण आलेल्या सुरेश भटांनी आपल्या  लेखणीतून कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. हा इतिहास आणि दैदीप्यमान वारसा लाभलेले नागपूर आणि महाराष्ट्र 21 व्या शतकाच्या नव्या भारताच्या सृजनात  योगदान देईल यात तीळमात्र शंका नसल्याचे कोविंद यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही समयोचित व विषयानुरूप भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रस्तावित महापौर नंदा जिचकार,  सूत्रसंचालन दयाशंकर तिवारी आणि आभार प्रदर्शन मनपा आयुक्त अश्‍विन मुदगल यांनी व्यक्त केले.