Breaking News

नगर जिल्ह्याला पावसाने झोडपले

। सरासरी  गेली 126 टक्क्यावर अकोले, श्रीरामपूर,पाथर्डीत तूफान पाऊस, रब्बीच्या पेरण्या लांबल्या, सर्व धरणे भरली

अहमदनगर, दि. 21, सप्टेंबर - सप्टेंबर महिन्यात रमलेला पाऊस पाय काढण्याचे नाव घेत नसून महिना संपत आला तसा पावसाला पुन्हा जोर चढला आहे.  हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जोरदार पावसाने नगर जिल्ह्याला झोडपून काढले आहे. बुधवारी नगर शहराबरोबरच अनेक तालुक्यात पावसामुळे जनजीवन  विसकळीत झाले. रात्रीपर्यंत संततधार सुरूच होती.
गेल्या  काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने नगर जिल्ह्यातील बहुतेक धरणे, प्रकल्प भरली आहेत. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणातून पाण्याचा  विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे.दोन-तीन दिवसापूर्वी उन्हचा चटका जाणवत होता. त्यामुळे पाऊस येईल ,असे वाटत होते. त्याची प्रचिती आली. आज  सकाळपासून पश्‍चिमेच्या बाजुने काळे मेघ शहरावर चालून आले. दुपारी पावसाला सुरवात झाली.काही मिनिटातच शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसाने  पुन्हा श्रावण  महिन्यासारखे वातावरण निर्माण झाले. नवरात्रोत्सव गुरुवारपासून सुरू होत  असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस वाढण्याची शक्यात पाहता   नवरात्रीतही  पाऊस रमण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्ह्याच्या बहुतेक तालुक्यात पावसाने सकाळपासूनच आघाडी उघडली होती.
अकोले तालुक्यात सर्वात जास्त पाऊस झाल्याचे वृत्त आहे.अकोल्यात अनेक ठिकाणी पूर  आले असून काहीही पूलही पाण्याखाली गेले आहेत.श्रीरामपूरलाही दुपारी  जोरदार पाऊस झाला.पारनेरला पाऊसाने धुमाकूळ घातला. राहुरीलाही मुसळधार पावसाने झोड उठविली.दुपारनंतर संततधार सुरू होती.कोपरगाव,संगमनेरला  मंगळवारी रात्री चांगला पाऊस झाला.नेवाश्यालाही मंगळवारी रात्री पाऊस झाला. पाथर्डीला दुपारी पावसाने अनेक नद्यांना पाणी आले. इतर तालुक्यातही  कमी-अधिक फरकाने पाऊस नोंदला गेला. या पावसाने खरिपातील बाजरी, उडीद पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पाथर्डीत दमदार पाऊस
पाथर्डी ः  उतरा नक्षत्रातील दमदार पावसाने तालुक्यात सरासरी एवढा पाउस पूर्ण झाला असुन पावसाचा जोर पाथर्डी पासुन नगर शहरापर्यंत अधिक असल्याने  कल्याण विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग दुपारी पाच वाजल्यापासुन रात्री उशीरापर्यंत पुरामुळे बंद होता .सायंकाळी सहा नंतर तिसगाव व करंजी येथुन पुर  ओसरल्यानंतर वाहतुक सुरू झाली परंतु मेहकरी नदीला मोठा पुर आल्याने नगर रस्ता वाहतुक बंद राहिली अनेकांनी पांढरीपुल मिरी तिसगाव मार्गे पाथर्डी असा  प्रवास पूर्ण केला.
आज तालुक्याचा आठवडे बाजार मात्र दुपारी 1 वाजता पावसाची जोरदार सुरवात झाल्याने  बाजार विस्कळीत झाला शेतकर्‍यांचा मोठया प्रमाणात भाजीपाला वाया  गेला तर अनेकांना पावसामुळे बाजार न करता आल्याने रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. संततधार पावसाने रस्ते निर्मनुष्य झाले. बँका, तहसील कार्यालय,  पंचायत समिती सह सर्वच शासकीय कार्यलयात शुकशुकाट होता. प्रत्येक जण कुठेतरी आडोशाला उभा राहिलेला दिसत होता . चहाच्या हॉटेलवर मात्र गर्दी मोठया  प्रमाणात होती .रस्त्यावर वाहनाची वर्दळ सुद्धा दिवसभर थंडावली होती.बाजारात पावसाची वार्षिक सरासरी 579 मि.मि. असुन पूर्व भाग वगळता उर्वरीत तालुक्याची  पावसाची सरासरी ओलांडली गेली आहे. अन्य केंद्रावर सरासरीच्या आसपास पाउस पोहचला आहे. कापूस, बाजरी, तुर अदि पिकांचे नुकसान झाले आहे.नद्या  ,नाले, ओढे भरभरून वाहात आहेत पाणीटंचाई मात्र पूर्णपणे संपली असुन खरवंडी कासार, भलगाव येळी, अकोला या भागात पावसाचा जोर कमी होता. मोहटादेवी  परिसरातही मोठा पाउस झाल्याने नवरात्र उत्सवासाठीच्या भाविकांना भक्तनिवास व पारायण हॉलचा आधार घ्यावा लागला. तालुक्यात जोरदार पाउस झाला असला  तरी कठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
पारनेरमध्ये मुसळधार
पावसाने नद्यांना पूर
पारनेर ः पारनेर तालुक्यात आज बुधवारी पाऊसाने सगळीकडेच  दमदार हजेरी लावली असून सर्वच ओढे ,नाल्याना पूर गेले आहे तसेच तालुक्यातील बहुतांश  तलाव भरून  ओसंडून वाहू लागले आहेत
 आज बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासूनच तालुक्यात पावसाळा सुरुवात झाली असून तालुक्यातील भाळवणी ,सूप, हंगा, निघोज, टाकळी ढोकेश्‍वर ,पारनेर,  ढवळपुरी, मांडावे, खडकवाडी, कान्हूर पठार सह तालुक्यातील सर्वच ठिकाणी पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे या दिवसभर चाललेल्या पाऊसाने गावागावातील  ओढ्या नाल्याना पूर आले असून तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत
 मात्र या पुरामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले असून शेतातील पिके पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे तर पाणी झाल्याने काही शेतकरी सुखावलाही  आहे
 पारनेर तालुक्यात झालेल्या पाऊसाने हंगा ,मांडओहळ ,काळू चा प्रकल्प ,भांडगाव ,जाधववाडी ,वडझिरे आदी पाणीपुरवठा करणार्‍या तलावात पाण्याची आवक  मोठ्या प्रमाणात झाली आहे.  तर पाऊसामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांवरील पुलांवरून पाणी वाहिल्याने काही वेळ वाहतूकही ठप्प झाली होती