Breaking News

शालेय पोषण आहार कामगार संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा

बुलडाणा, दि. 13, सप्टेंबर - शासनाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना  पोषण आहार देण्यात येतो. हा पोषण आहार शिजवून देणार्‍या शेकडो कामगारांचे  मानधन थकले आहे. त्यामुळे या  शालेय  पोषण आहार कामगारांवर उपासमारीची पाळी आली  असून, सदर कामगार आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही  मार्गाने  आंदोलन करणार असल्याचा इशारा स्थानिक पंचायत  समिती सभागृहामध्ये 10 सप्टेंबर रोजी  आयोजित शालेय  पोषण आहार कामगारांच्या सभेत दिला.
या सभेच्या अध्यक्षस्थानी अनिल राठोड हे होते. तर प्रमुख  अतिथी म्हणून समाधान राठोड, पुष्पाबाई बोरकर, भागवत  पांढरे, वसंता बकाल, मारोती देबाजे,  संगीता नेमाडे, मोहन  राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सीटू संघटनेचे  जिल्हा अध्यक्ष समाधान राठोड यांनी कामगारांच्या  मागण्यांसंदर्भात सभेमध्ये  मार्गदर्शन करून कामगारांना  येणार्‍या  अडीअडचणीवर लोकशाही मार्गाने आंदोलन  करण्याचा इशारा देऊन शासनाने या गरीब व होतकरू  कामगारांचे मानधन  वेळेवर द्यावे, अशी आपण शासनाकडे  मागणी करू, असे सांगितले. यावेळी पुष्पाबाई बोरकर, संगी ता नेमाडे यांनी सविस्तर मागण्या मांडून मार्गदर्शन केले.   सूत्रसंचालन कार्तिक घाटोळकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सचिन धोटे यांनी केले. कार्यक्रमाला कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.