Breaking News

ग्रामपचंयात निवडणूक बिनविरोध करुन गावाचा विकास साधावा : श्‍वेता महाले यांचे आवाहन

बुलडाणा, दि. 25, सप्टेंबर - पंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्राम पंचायतीची भूमिका अतिशय महत्वाची आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची  थेट ग्राम पंचायतीद्वारे अंमलबजावणी होत असल्याने ग्राम पंचायत निवडतांना सहाजिकच गावाच्या विकासाला अग्रक्रम देणे गरजेचे असते. म्हणूनच ग्राम विकासाची  दृष्टी असलेले सरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्य एकमताने निवडून संपूर्ण ग्राम पंचायत अविरोध निवडावी व आपल्या गावाचा अधिकाधिक विकास साधावा, असे  आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्‍वेता  महाले यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
चिखली तालुक्यातील 36 ग्राम पंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. या वर्षीपासून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा क्रांतीकारी निर्णय राज्य  सरकारने घेतला आहे. येत्या 7 ऑक्टोंबर रोजी यासाठी प्रत्यक्ष मतदान होत आहे. याद्वारे गावकरी आपले सरपंच व ग्राम पंचायत सदस्य निवडतील. मात्र तत्पूर्वीच  ही निवड एकमताने झाल्यास ग्राम पंचायतीचा कारभार सर्वसहमतीने होऊन एकोप्याने गावाची उन्नती करणे शक्य होईल अशी आशा श्‍वेताताई महाले यांनी पत्रकातून  व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने काही ग्राम विकासाच्या योजनांसाठी ग्राम पंचायत बिनविरोध निवडण्याची अट घातली आहे. या शिवाय अश्या अविरोध  निवडल्या गेलेल्या ग्राम पंचायतींना पुरस्काराच्या स्वरूपात भरघोस रक्कम देखील दिली जाते. या रकमेतून गावात मुलभूत नागरी सुविधा पुरविणे तसेच गावाचा  कायापालट करणे सहज शक्य होईल, असा विश्‍वास श्‍वेता महाले यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही ग्राम  विकासाच्या बाबतीत संवेदनशील व आग्रही आहेत. देशाचे व राज्याचे नेतृत्व करणार्या या दोन्ही नेत्यांच्या संकल्पनेतील आधुनिक व विकसीत ग्राम प्रत्यक्षात  उतरवण्यासाठी ग्राम पंचायत निवडणूक अविरोध होणे आवश्यक असल्याचे महाले यांनी पत्रकात म्हटले आहे.
आपल्या गावाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर करायचे असेल तर संपूर्ण ग्राम पंचायत बिनविरोध निवडणे ही उत्तम संधी असल्याची जाणीव श्रीमती महाले यांनी ग्रामीण  मतदारांना सदर पत्रकातून करून दिली आहे. या खेरीज ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास निवडणूकीवर होणारा खर्च देखील वाचेल, ह्या वाचलेल्या  पैशातून आपल्याच गावात चार चांगली कामे करता येतील असेही त्या म्हणाल्या.
आपल्या देशाची अर्थव्यवस्था आजही कृषीवर आधारीत आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर 70 वर्षे पूर्ण झाली, तरी देखील देशाचा ग्रामीण चेहरा - मोहरा अद्याप पूर्णत :  बदलला नाही या वस्तुस्थितीकडे श्‍वेताताईंनी ग्रामीण जनतेचे लक्ष वेधले आहे. शहरीकरणाच्या धडाक्यात गाव - खेडी उपेक्षित राहणे देशहिताच्या दृष्टीने योग्य होणार  नाही. म्हणून विकसित व स्वयंपूर्ण खेडी निर्माण झाली पाहिजेत. या माध्यमातूनच विकासात्मक परिवर्तन घडू शकते असे श्‍वेता महाले या पत्रकात म्हणतात. असे समग्र  परिवर्तन घडवून आणायचे असेल तर प्रथमत: आपले संकुचित स्वार्थ बाजूला ठेवावे लागतील. निस्वार्थी वृत्तीने एकत्र आलेल्या अश्या लोक निर्वाचित सरपंच व  सदस्यांकडून गावाच्या विकासाचे व शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, दलित, अल्पसंख्यांक तसेच सर्वसामान्य गावकर्‍यांचे  भले होऊ शकेल, म्हणूनच व्यापक हित  डोळ्यासमोर ठेवून  जास्तित जास्त ग्राम पंचायती बिनविरोध निवडाव्या असे आवाहन श्‍वेता  महाले यांनी केले आहे.