Breaking News

परिवार सोडला म्हणणा-यांनी अण्णासाहेबांचा आदर्श घ्यावा : अजित पवार

पुणे, दि. 30, सप्टेंबर - अण्णासाहेब मगर यांचे कार्य हे ग्रामीण विकास आणि सहकार क्षेत्रामध्ये मोठे आहे. हे सर्व काम त्यांनी परिवाराची जबाबदारी यशस्वीरीत्या  सांभाळत उभे केले. सध्या देशासाठी परिवार सोडला म्हणणा-यांची संख्या वाढत आहे. अशा लोकांनी अण्णासाहेबांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन माजी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. डॉ. सीमा सागर काळभोर लिखित अमेय प्रकाशनाचे ’कर्मयोगी अण्णासाहेब मगर काळ, व्यक्तित्व व कर्तृत्व’ या शोधग्रंथाचे  लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, जगन्नाथ शेवाळे, राजा दिक्षित, उल्हास लाटकर, सुरेश घुले  आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, अण्णासाहेबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि सहकार क्षेत्राचे नेतृत्त्व केले. गर्भ श्रीमंत असूनही अण्णासाहेबांनी त्यांची श्रीमंती कधी दाखविली  नाही. जमीनीवर पाय ठेवून त्यांनी समाजासाठी काम केले. आजकालच्या नवश्रीमंतांमध्ये ही वृत्ती दिसत नाही. त्यांच्या कार्यापासून नव्या पिढीने प्रेरणा घ्यायला हवी.  अण्णासाहेबांनी सुरू केलेल्या थेरगाव कारखान्याची अवस्था आज काय झाली आहे, ती कुणामुळे झाली याचा विचार करायला हवा. लोक स्वतःच्या फायद्यासाठी  मोठ्या लोकांच्या नावे संस्था काढतात आणि नेमके त्या लोकांच्या विचारसरणीला विसंगत काम करतात. पिंपरी शहराचा विकास करताना अण्णासाहेबांनी  नियोजनबद्ध पाऊल टाकले, त्यामुळे गेली काही वर्ष आम्ही पिंपरीत चांगले काम करू शकलो.
या वेळी उल्हास पवार म्हणाले, अण्णासाहेबांची कार्यशैली वेगळी होती. त्यांचे कार्य आजच्या पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. ते परीवर्तनाचे शिलेदार होते.  त्यांनी समाजकारण आणि राजकारणाची आदर्श सांगड घातली होती. कामगारांच्या हक्कासाठीही त्यांनी मोठे योगदान दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सीमा काळभोर  यांनी केले, तर माजी उपमहापौर निलेश निकम यांनी आभार मानले.