Breaking News

बुलेट ट्रेन आणण्याआधी उपनगरीय रेल्वेकडे लक्ष द्यावे - संजय निरुपम

मुंबई, दि. 30, सप्टेंबर -  एकीकडे मुंबईची जीवन वाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेवर दररोज काहीना काही समस्या निर्माण होत असते. अशा स्थितीत  उपनगरीय रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून बुलेय ट्रेन आणण्याकडे सरकारचा अधिक कल दिसतो, हे दुर्दैव  आहे, असे प्रतिपादन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज येथे केले. 
आज एल्फिस्टन रोड - परेल स्टेशनवर जी घटना घडली ती अत्यंत दुःखदायक आणि क्लेशदायक आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये 22 मुंबईकर मृत्युमुखी पडले त्यांना  मी मनापासून श्रद्धांजली वाहतो आणि जे 36 मुंबईकर जखमी झालेले आहेत ते लवकरात लवकर चांगले व्हावेत यासाठी मी अंबेमातेकडे प्रार्थना करतो, अशी भावना  व्यक्त करतो.
राजकारण करण्याची वेळ नाही परंतु काही प्रश्‍न उपस्थित हे होतातच. खरंच आपल्याला 1 लाख करोड रुपये खर्च करून बुलेट ट्रेन आणण्याची गरज आहे का ?  त्यापेक्षा सरकारने लोकल ट्रेनच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यायला नको का ? शिवसेना भाजपा सरकार येऊन साडे तीन वर्षे झाली पण हे सरकार स्टेशनची नावे  बदलण्यामध्ये व्यस्त आहेत, परंतु लोकल ट्रेन, रेल्वे स्टेशन आणि स्टेशनवरील ब्रिज यांच्या पायाभूत सुविधांकडे सरकारचे लक्ष नाही. मुंबईतील काही रेल्वे  स्टेशन्सना 100 वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांच्याकडे खरंच गांभीर्याने बघण्याची गरज आहे. सर्व स्टेशनचा सर्वांगीण विकास केला पाहिजे. सरकारकडे पैशाची  कमतरता नाही आहे, 45 हजार करोडचे बजेट आहे. परंतु शिवसेना भाजपा सरकारची इच्छाशक्ती आणि चांगले काम करण्याचा दृष्टिकोन नाही, जिद्द नाही आहे,  म्हणून मी म्हणतो आहे बुलेट ट्रेन राहू द्या, लोकल ट्रेनकडे लक्ष द्या, असेही निरुपम म्हणाले.