Breaking News

दररोज चितेवर जळणारी माणसं पहायला आम्ही मुर्दाड नाही - आ. जितेंद्र आव्हाड

ठाणे, दि. 30, सप्टेंबर -  दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणार्यांच्या पैशातून देशाची रेल्वे सेवा सुरू आहे. या लोकल सेवेची वाताहत करून बुलेट ट्रेनची भाषा  कशासाठी ? या ट्रेनचा वापर कितीजण करणार? असा सवाल करून ज्याच्या जीवावर जगता त्याला त्याच्या मृत्यूचे आमंत्रण देऊ नका. कारण दररोज चितेवर  जळणारी आमची माणसं पहायला आम्ही मुर्दाड नाही, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. 
एलफिन्सटन येथे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना आ. आव्हाड यांनी आदरांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासन आणि सरकारवर  जोरदार आगपाखड केली.
आ. आव्हाड पुढे म्हणाले की , येथील सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी कितीवेळा लोकसभेमध्ये मुंबईच्या लोकल रेल्वे प्रवाशांचा आवाज उठवला ? कर्जत - कसारा -  मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणारे लाखो रेल्वे प्रवाशी हे जीव मुठीत धरुनच प्रवास करतात. कालच ठाणे ते दिवा दरम्यान गर्दीचा दाब सहन न झाल्याने 4 रेल्वे  प्रवाशी रेल्वेमधून खाली पडले त्यामधील एक जणाचा मृत्यु झाला. हि जबाबदारी कोणी घ्यायची? असा सवाल करीत, एकीकडे ह्या सगळ्यांमध्ये सुधारणा  करण्यासाठी मुंबईच्या सबर्बन एलिव्हेटेड रेल्वेची भाषा करणारे सरकार आता त्यावर बोलायलाच तयार नाही. 45 हजार कोटी रुपये खर्च करुन सुधारणा करता  येतील असे म्हणणारे सुरेश प्रभु हे मंत्रालयातून बाहेर गेलेत. सबंध भारतालील रेल्वे कोणाच्या जिवावर जिवंत आहे. तर ती दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणार्या  सामान्य प्रवाशांच्या जिवावर जिवंत आहे. त्या सबर्बन रेल्वेचे वाटोळे करायचे आणि बुलेट ट्रेनची भाषा करायची कशासाठी ? बुलेट ट्रेनचा वापर किती जण करणार  आणि दररोज सबर्बन रेल्वेचा वापर किती जण करतात. जरा तरी माणूसकी बाळगा. ज्याच्या जिवावर जगता निदान त्यालाच त्याच्या मरणाच आमंत्रण देऊ नका.  शेवटी मराठी माणसाची जात हि सहन करते. पण, दररोज चितेवर जळणारी आमची माणसं पाहायला आम्ही मुर्दांड नाही एवढ लक्षात ठेवा. एक ना एक दिवस त्याचा  उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला.