Breaking News

रविवारी पुण्यात भव्य फुटबॉल कार्निव्हल; फिफा स्पर्धेत सहभागी भारतीय संघाला शोभायात्रेतून शुभेच्छा

पुणे, दि. 30, सप्टेंबर - भारतात 6 ऑक्टोबर रोजी होणार्‍या फिफा विश्‍वचषक स्पर्धेत सहभागी होणार्‍या भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी पुण्यात फुटबॉल  कार्निव्हल आणि भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता जंगली महाराज मंदिरापासून शोभायात्रेची सुरुवात  होणार आहे. यामध्ये विविध शाळांमधील तब्बल दीड हजार विद्यार्थी, फुटबॉलपटूंचा सहभाग असणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी  दिली. 
महाराष्ट्र शासन, क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटना, नॅशनल युवा को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड व  सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या सहयोगाने फुटबॉल कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय मानव संसाधन आणि विकास मंत्री प्रकाश  जावडेकर, राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, महापौर मुक्ता टिळक यावेळी उपस्थित  राहणार आहेत. माजी ऑलिंपियन, अर्जुन पुरस्कार विजेते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, जिल्हा पुरस्कार विजेते देखील कार्निव्हलमध्ये सहभागी होतील.
जंगली महाराज मंदिरात आरती झाल्यानंतर प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते फिफा आणि भारताचा झेंडा दाखवून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. शोभायात्रेत तीन  रथ असतील. यामध्ये थीम साँग, ट्रॉलीवरील फुटबॉल ग्राऊंड, भारतीय संघातील खेळाडूंचे फोटो, वर्ल्डकप ट्रॉफी याचा समावेश असणार आहे. यासोबतच ढोल-ताशा  पथक आणि तलवारबाजी, दांडपट्टा यांसारखे मर्दानी खेळ यावेळी सादर केले जाणार आहेत. पुण्यातील विविध शाळांमधील तब्बल 1500 विद्यार्थी यावेळी रस्त्यावर  फुटबॉल खेळणार आहेत. प्रसिद्ध फुटबॉल जगलर कुणाल राठी यावेळी आपली कला सादर करणार आहे. शुभेच्छा फलकावर स्वाक्षरी करुन पुणेकर भारतीय संघाला  शुभेच्छा देणार आहेत.