Breaking News

खा. बारणे आणि आ. जगताप यांच्यातील संघर्ष पेटला

पुणे, दि. 22, सप्टेंबर - मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप  यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. आगामी 2019 च्या लोकसभा  निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्यात पुन्हा कलगीतुरा रंगला आहे. 2 वेळा समोरासमोर लढल्यानंतर आणि दोघांनीही एकेकदा पराभवाची चव चाखल्यानंतर पुन्हा  एकमेकांच्या ‘आमने-सामने’ लढण्याचे चित्र दिसू लागले आहे. मावळ लोकसभेसाठी बारणे व जगताप यांनी एकमेकांना लढण्याचे खुले आव्हान दिले आहे.
श्रीरंग बारणे व लक्ष्मण जगताप सर्वप्रथम 2009 च्या विधानसभा निवडणुकीत समोरासमोर आले होते. चिंचवड विधानसभेसाठी बारणे शिवसेनेचे उमेदवार होते.  आघाडीच्या जागावाटपात चिंचवडची जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या गोटात असलेल्या आमदार जगताप यांनी बंडखोरी करून निवडणूक  लढवली. तेव्हा जगताप निवडून आले होते. विधानसभेत पराभूत झाल्यानंतर बारणे यांनी 2012 मध्ये पुन्हा महापालिकेची निवडणूक लढवली, तेव्हा ते निवडून आले  होते. 2014 मध्ये नगरसेवक असतानाच बारणे यांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्या वेळी मनसे-शेकाप युतीचे उमेदवार म्हणून लक्ष्मण जगताप  रिंगणात उतरले होते. मात्र, बारणे यांच्याकडून मोठ्या फरकाने जगताप पराभूत झाले होते. विधानसभेत जगतापांकडून पराभूत झालेल्या बारणे यांनी लोकसभेत त्या  पराभवाची परतफेड केली. आता श्रीरंग बारणे शिवसेनेचे शहरातील प्रमुख नेते आहेत. तर, लक्ष्मण जगताप पिंपरी भाजपचे शहरप्रमुख आहेत. दोघांमध्ये आजही  कायम कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो.
लोकसभा निवडणुकांचे पडघम सुरू झाले आहे. मावळ लोकसभेचे संभाव्य उमेदवार मानल्या जाणार्‍या बारणे व जगताप यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे.  नुकतेच लक्ष्मण जगताप यांनी पत्रक काढत खासदार बारणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, श्रीरंग बारणे मोदी लाटेवर खासदार झाले आहेत.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच ठिकाणी बारणे यांना अपयश आले आहे. पक्षासाठी आणि जनतेसाठी बारणे अपयशी खासदार ठरले आहेत. भाजपची  सर्वत्र विजयी घौडदौड सुरू असल्याची बारणे यांनी धास्ती घेतली आहे. बारणे सध्या शिवसेनेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत. त्यासाठीच पक्षात विनाकारण  वाद उकरून काढत आहेत. त्यांच्यात हिंमत असल्यास त्यांनी शिवसेनेकडून खासदारकीची निवडणूक लढवून दाखवावी. भाजपचे कार्यकर्ते त्यांना आस्मान  दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.
त्यानंतर श्रीरंग बारणे यांनी याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, श्रीरंग बारणे या नावाची जगतापांनी धास्ती घेतली  आहे. त्यामुळेच आव्हान देण्याचे उसने अवसान ते आणत आहेत. अशाच प्रकारे 2014 मध्ये त्यांनी, बारणे उमेदवार असतील तरच मी लोकसभा लढणार, असे  आव्हान दिले होते. प्रत्यक्षात, मोठ्या फरकाने मी विजयी झालो. आता 2019 साठी जगताप पुन्हा आव्हान देत आहेत. तो माझ्यासाठी शुभशकूनच आहे. जगताप  यांना भाजपमुळे अंगावर मुठभर मांस वाढल्यासारखे वाटत असेल, त्यामुळे ते वल्गना करू लागले आहेत. जगतापही मोदी लाटेमुळेच आमदार झाले आहेत, त्याचे  त्यांनी आत्मपरीक्षण करावे. 13 वर्षे ते आमदार आहेत. किती वेळा सभागृहात त्यांनी तोंड उघडले, हे त्यांनी पिंपरी चिंचवडच्या जनतेला सांगावे. शिवसेनेत  येण्यासाठी त्यांनी ‘मातोश्री’च्या पायर्‍या झिजवूनही त्यांना थारा मिळाला नाही. 3 वर्षांपूर्वी ते भाजपमध्ये गेले. मात्र, सगळीकडे आपल्यामुळेच भाजपची सत्ता  आल्याचा आव ते आणत आहेत.
दरम्यान खासदार बारणे आणि आमदार जगताप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे शहरात राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. येत्या काही दिवसांत यांच्यातील  वाद आणखीनच विकोपाला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.