दगडूशेठ गणपतीचे भक्तीभावे साडेसात वाजता विसर्जन
पुणे, दि. 06, सप्टेंबर - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती धूम्रवर्ण रथातून सकाळी सात वाजता टिळक चौकात दाखल झाला आणि गणपती बाप्पा मोरया.. मंगल मूर्ती मोरया या प्रचंड जयघोषाने अवघा टिळक चौक दुमदुमला. सर्व उपस्थितांच्या नजरा आकर्षक रोषणाईने नटलेल्या धूम्रवर्ण रथावर खिळल्या.रात्री दोन वाजून चाळीस मिनिटांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणुकीत सहभागी झाली. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते बेलबाग चौकात गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर शुक्ला यांनी स्वतः धुम्रवर्ण रथाचे सारथ्य केले. आकर्षक अशा धूम्रवर्ण रथापुढे मंडळाचा नगारा.. त्यापाठोपाठ प्रभात बँडचे पथक.. स्वरूप ढोल ताशा पथक..आणि मोरया मोरयाच्या गजरात विसर्जन मिरवणूक पुढे पुढे सरकत होती.सकाळी बरोबर सातच्या ठोक्याला धुम्रवर्ण रथ टिळक चौकात दाखल झाला. यावेळी महापालिकेच्या सभामंडपात असलेल्या महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी काही वेळ रथाचे सारथ्य केले. याच चौकात बाप्पाच्या दर्शनासाठी मिळेल तिथे जागा धरून उभ्या असलेल्या नागरिकांच्या गर्दीने अवघा टिळक चौक गर्दीने फुलून गेला होता. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...आणि मोरया मोरया या जयघोषाने टिळक चौक दुमदुमून गेला.. महापौरांच्या हस्ते आरती झाल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी टिळक चौकातून पुढे मार्गस्थ झाला आणि साडेसात वाजता आरती झाल्यानंतर त्याचे विसर्जन झाले.
