Breaking News

भीमेकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

पंढरपूर, दि. 01, सप्टेंबर - उजनी धरणातून सध्या 30 हजार क्युसेक इतका पाण्याचा भीमा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंढरपूर शहरात पूरस्थिती निर्माण  होण्याची शक्यता नाही. कारण उजनी धरणाच्या वरील भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याचा विसर्गदेखील धरणातून कमी करण्यात येईल. मात्र, तरीही  नदीकाठच्या गावांना तसेच शहरात नदीकाठावर राहत असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती येथील तहसीलदार मधूसुदन बर्गे  यांनी दिली.उजनी धरणातील पाण्याच्या विसर्ग आणि पूरस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी केलेल्या उपाययोजनेसंदर्भात तहसीलदार बर्गे म्हणाले, उजनी  धरण शंभर टक्क्यांहून अधिक भरले आहे. धरणाच्या वरील क्षेत्रांत पावसाचा जोर आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून धरणातून भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू  आहे. धरणातून सोडलेले पाणी पंढरीच्या चंद्रभागेत पोहोचले आहे. उजनी धरणातून आतापर्यंतच्या सोडलेल्या पाण्यामुळे सध्या येथील जुना दगडी पूल पाण्याखाली  गेला आहे. सुमारे 75 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग धरणातून झाल्यास नदीपात्रातून शहरात पाणी शिरते. एवढा विसर्ग धरणातून नदीमध्ये सध्या होत नाही.  त्यामुळे सद्य:स्थितीत तरी पंढरपूर शहरात पूरस्थितीची शक्यता नाही. तरीदेखील महसूल, नगरपालिकेला आणि पोलीस प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात  आलेला आहे.