Breaking News

काष्टीच्या नामांकित पतसंस्थेत घोटाळा; ठेवी काढण्यासाठी संस्थेत गर्दी

अहमदनगर, दि. 03, सप्टेंबर - तालुक्यातील काष्टी गावात असलेल्या एका नामांकित पतसंस्थेत मोठा आर्थिक घोटाळा होत असल्याचा संशय व्यक्त झाल्याने  अनेकांनी लाखो रुपयांच्या मुदत ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली आहे. ठेवी बुडणार असल्याच्या भितीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पैसे  काढण्यासाठी ठेवीदारांची मोठी गर्दी होत आहे. 
काष्टी हे आर्थिकदृष्ट्या मोठया बाजारपेठेचे गाव असल्यामुळे या गावात राज्यात प्रसिद्ध असा मोठा आठवडे बाजार भरतो. त्यातून मोठी उलाढाल होते. बाजारपेठेचे  मोठे आर्थिक केंद्र असल्याने गावात किमान 25 ते 30 लहानमोठ्या ग्रामीण बिगर शेती सहकारी नागरी पतसंस्था आहेत. परंतु, त्यामधील बोटावरमोजण्या इतक्याच  संस्था चांगल्या चाललेल्या आहेत. त्यातील एक नामांकित पतसंस्था गेली अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मागेल त्यांना शेती, वाहन, घर, जागा, फ्लॅट घेण्यासाठी  वेळेवर बिगर कागदपत्र व बिगर जामीनदारांचे कर्ज देणे वेळेवर वसुल करणे असा या पतसंस्थेचा दैनंदिन कारभार चालतो. ठेवीदार आणि सभासदांचा विश्‍वास संपादन  करुन बाजारपेठेत नाव व प्रतिष्ठा मिळविली. त्यामुळे अनेक ग्राहक व्यापारी यांनी मोठ्या विश्‍वासार्हतेने हजारो रुपयांपासून कोट्यवधी रुपयांपर्यत या पतसंस्थेत ठेवी  ठेवल्या. यातून संस्थेला मोठे आर्थिक भांडवल तयार झाल्यानंतर ज्याची पत त्याला संस्था म्हणून मागेल त्याला कर्जसुविधा उपलब्ध करुन देते. संचालक मंडळाला  विश्‍वासात न घेता संस्थाचालक परस्पर तालूका कार्यक्षेत्र असतांना नियमाचे उल्लंघन करुन तालुक्याच्या बाहेर कर्ज वाटप करतात आणि कर्जाची मर्यादा कमी  असताना जास्त कर्ज वाटप केले जाते आणि तेथूनच खरी आर्थिक लूट सुरु झाली. कुंपनच शेत खाऊ लागले, अशी या पतसंस्थेची अवस्था झाली आहे.