Breaking News

विद्यार्थी, महिलांसाठी स्वतंत्र बसफेर्‍या त्वरित वाढवा - रंजन ठाकरे

नाशिक, दि. 23, सप्टेंबर - विद्यार्थी व महिलांसाठी स्वतंत्र बस सुरु करून शहरातील सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास कमी करावा याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाने पंचवटी बस डेपोच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करून शहराध्यक्ष रंजन ठाकरे व शिष्टमंडळाने राज्य परिवहन महामंडळाचे पंचवटी आगार व्यवस्थापक शुभांगी  शिरसाठ यांना निवेदन दिले. 
नाशिक शहरातील बस फेर्‍या कमी झाल्याने शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी मिळेल त्या बसने प्रवास करीत आहे. यामुळे बसमध्ये गर्दी वाढून विद्यार्थिनींच्या  छेडछाडीचे कारण ठरते. विद्यार्थिनी व महिलांसाठी स्वतंत्र बस असताना बसफेर्‍या कमी केल्याने टवाळखोर या बसने प्रवास करून विद्यार्थिनी, युवती व महिलांची  छेडछाड करतात. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असणार्‍या राज्य परिवहन महामंडळाने वाढत्या तोट्याचे कारण देत शहरी भागातील बसफेर्‍या कमी केल्या.  शहरात 274 बसफेर्‍यांपैकी केवळ 129 बसफेर्‍या सुरु असून 145 बसफेर्‍या बंद केल्या आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतर्गत महापालिकेने 100  बस दिल्या असताना शहरातील बसफेर्‍या कमी करण्यात आल्या तसेच अनेक बस या नादुरुस्त अवस्थेत आहे. शहरातील मेळा बसस्थानक हाय-टेक करण्याचा  मानस असताना दुसरीकडे बसफेर्‍या बंद करणे ही अत्यंत खेदाची बाब आहे.
शहरातील बसफेर्‍या निम्म्यावर आल्याने याचा सर्वाधिक फटका शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. बससंख्या मर्यादित असल्याने  शाळा-महाविद्यालय सुटल्यानंतर बसथांब्यावर प्रचंड गर्दी होते व मिळेल त्या बसने प्रवास करीत असल्याने एकाच बसमध्ये 100-150 विद्यार्थी, विद्यार्थिनी जीव  मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या गर्दीत टवाळखोर विद्यार्थिनीची छेड काढतात व यास विरोध करणार्‍या प्रवाश्यांना मारहाण सुद्धा करतात त्यामुळे विद्यार्थी  व विद्यार्थिनीमध्ये भयभीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने युवती व महिलांसाठी स्वतंत्र बस फेर्‍या वाढविण्यात यावा अशी मागणी या निवेदनात  केली आहे. मागणीचा गांभीर्याने विचार न केल्यास पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला.
महामंडळ अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे बस दुरुस्त न करताच रस्त्यावर चालविली जाते व यातून अपघात घडतात. बस नादुरुस्त असताना अपघात घडतात व  यात बस चालकांनाच दोषी ठरविले जाते तर अधिकारी सुरक्षित असतात. बसफेर्‍या कमी झाल्याने आडगाव मध्ये 25 तर सातपूरमध्ये 1 विद्यार्थी बसमधून  पडल्याच्या घटना घडल्या आहे. शहर बसफेर्‍या कमी झाल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त असताना परिवहन खाते असलेली शिवसेना गप्प का हे कोडे जनतेला पडलेले  आहे.
याप्रसंगी माजी नगरसेविका कविता कर्डक, सुनिता शिंदे, समाधान जाधव, शहर सरचिटणीस संजय खैरनार, शंकर मोकळ, संजय बोडके, सागर लामखेडे, संदीप  शिंदे, अनिल परदेशी, संतोष जगताप, सनी ओबेरॉय, किरण पानकर, बाळासाहेब कागड, शरद नवले, किरण जगझाप, सुशांत काकड, पंकज गरुड, प्रसाद राजोळे,  चेतन देशमुख आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.