Breaking News

प्रधानमंत्री आवास योजनेत दिव्यांगांना घरे

प्रस्ताव चक्क कचराकुंडीत टाकून दिला
नेवासा पंचायत समितीचा प्रताप   

अहमदनगर, दि. 13, सप्टेंबर - एकीकडे देशाचे पंतप्रधान दिव्यांगांविषयी कमालीची सहानुभूती दाखवित असताना नेवासे तालुक्यातील प्रवरासंगम येथील  दिव्यांगांच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळणार्‍या घरांच्या प्रस्तावांना चक्क केराची टोपली दाखविण्याचा प्रताप येथील पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी केला  आहे. प्रवरासंगम येथील दिव्यांगांनी लेखी निवेदनाद्वारे हा आरोप केला आहे. पंचायत समितीच्या या पराक्रमाविषयी येथील दिव्यांगांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. 
यासंदर्भात प्रवरासंगमचे राजेंद्र विश्‍वनाथ भोकरे, अखिल युनूस शेख, संतोष भानुदास सुडके, गणेश नारायण सरोदे, कमल शंकर धनवटे, निखिल ज्ञानेश्‍वर भवर, आणि  रमेश एकनाथ जाधव यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे मिळावी, यासाठी  नेवासा पंचायत समिती कार्यालयात प्रस्ताव सादर केले. येथील दिव्यांगांना  राहण्यासाठी घरे नसल्याने त्यांना या योजनेंतर्गत घरे मिळावीत, असा ठराव दि. 25 डिसेम्बर 2016 रोजी केला. विशेष म्हणजे हा ठराव प्रवरासंगम येथील उपरोक्त  सात जणांच्या नाचवणे करण्यात आला होता. नितीन भालेकर हे या ठरावाचे सूचक तर पांडुरंग काळे अनुमोदक होते. मात्र या संदर्भात संबंधित दिव्यांगांनी पंचायत  समिती कार्यालयात पाठपुरावा केला असता हा विभाग सांभाळणार्‍या अधिकारी आणि गटविकास अधिकार्‍यांनी यासाठी अशा प्रकारची तरतूद नसल्याचे सांगितले. या  लोकांनी दिव्यांगांचा हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी नगरच्या वरिष्ठ कार्यालयात पाठविण्याची गरज होती. मात्र तसे न करता या महाभागांनी हा प्रस्तावच केराच्या  टोपलीत टाकून देण्याचे पाप केले. याकडे पंचायत समितीच्या सत्ताधारी पदाधिकार्‍यांचीही अक्षम्य दिरंगाई होत असल्याने तालुक्यातील दिव्यांगांमध्ये याविषयी प्रचंड  नाराजी पसरली आहे. या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात येणार असून या प्रश्‍नावर पंचायत  समिती कार्यालयावर दिव्यांगांच्यावतीने उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजेंद्र भोकरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दिला आहे.