Breaking News

राज्याच्या अनेक भागात पावसाचं जोरदार आगमन

मुंबई, दि. 13, सप्टेंबर - मुंबईसह राज्यभरात पावसानं जोरदार कमबॅक केलं आहे. काल मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागात विजाच्या कडकडाटासह मुसळधार  पाऊस बरसला. पावसाच्या जोरदार पुनरागमनामुळे बळीराजा काहीप्रमाणात सुखावला असून, उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.  गेल्या दोन दिवसांपासून मुंबईकरांना उन्हाळी झळ भासत असतानाच, काल रात्री झालेल्या मुसळधार पावासानं हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. काल  मध्यरात्री मुंबईत तुफान पावसानं हजेरी लावली. तब्बल 1 ते दीड तास मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. अजूनही मुंबईतल्या अनेक उपनगरांत  पावसाची रिपरिप सुरुच आहे.
तर तिकडे नवी मुंबईतही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसतो आहे. मध्यरात्री 2 च्या सुमारास विजांच्या कडकडांटासह पावसाला सुरुवात झाल्यानंतर  कामोठे आणि आसपासच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित करावा लागला. नाशिकमध्येही काल रात्री विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली.  पावसाचा जोर पाहता शहरातील अनेक भागांमधला वीजपुरवठा खंडीत झाला आहे. गेल्या दोन्ही वेळेस मुसळधार पावसामुळे नाशकात पूरपरिस्थिती ओढवली होती.  त्यामुळे आता तिसर्‍यांदाही पावसाचा जोर पाहता नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसानं काल रात्री लातूरला अक्षरश: झोडपून काढलं.  पावसाच्या जोरानं शहरातील नाना-नानी पार्क समोरील भेळच्या गाडीवर झाड कोसळलं, त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकही बंद आहे. तसंच कोल्हेनगर, श्रीकृष्णनगर,  कोयना रोड, बादाडे नगर आदी भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.