मिसा भारती यांचे दिल्लीतील फार्म हाऊस ‘ईडी’कडून जप्त
नवी दिल्ली, दि. 06, सप्टेंबर - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती यांच्या पतीचे दिल्लीतील फार्महाऊस सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) जप्त केले आहे. हे फार्म हाऊस पालम भागातील बिजवासन क्षेत्रातील आहे. बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी मिसा आणि त्यांचे पती शैलेश कुमार यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. 30 ते 40 कोटी इतकी या फार्म हाऊसची किंमत असून या फार्म हाऊसची खरेदी करण्यासाठी जैन ब्रदर्सच्या कंपन्यांचा वापर केला गेला होता. यापूर्वी सक्तवसूली संचालनालयाने 8 हजार कोटींची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी मिसा यांच्या निवासस्थानावर छापा टाकले होते. त्यांच्या तीन फार्म हाऊसची तपासणीही करण्यात आली होती. मिसा यांच्या घिटोरनी, बिजवासन व सैनिक फार्म हाऊस आदी फार्म हाऊसचा यात समावेश होता.
