Breaking News

सरकार पुरस्कृत दहशतवाद थांबवण्यासाठी लढा देऊ - अजित पवार

सोलापूर, दि. 30, सप्टेंबर -  ‘भाजप- शिवसेनेच्या तीन वर्षांच्या सत्ताकाळात राज्यातील जनता भरडून निघाली आहे. समाजातील प्रत्येक घटक सरकारच्या  कारभारावर नाराज आहे. नोटाबंदी, जीएसटीच्या निर्णयामुळे उद्योजक, कारखानदार, व्यापारी संकटात आले आहेत. अनेक कंपन्या आज कामगारांना कामावरून  काढत आहेत, शेतीमालास भाव नसल्याने शेतकरी संकटात अडकला आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना सरकारविरोधात बोलण्यासही बंदी घातली जात  आहे. आंदोलन, मोर्चा काढल्यास किंवा सोशल मीडियावर पंतप्रधान, मुख्यमंत्री, सरकारविरोधी बोलल्यास पोलिसांकडून चौकशीला बोलावले जात आहे. सत्ताधारी  सर्वसामान्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घेत आहे, हा सरकार पुरस्कृत दहशतवाद असून हे थांबवण्यासाठी आता आपण सर्वांनी मिळून लढा देण्यासाठी तयार राहिले  पाहिजे,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी केले.हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्यात ते  बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, निरीक्षक प्रदीप गारटकर, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील आदी  उपस्थित होते.‘राज्यातील सरकार दिल्लीतील नेत्यांच्या इशार्‍यावर चालते. निर्णय घेत असताना राज्याचे हित पाहिले जात नाही. मुंबई मेट्रोसाठी बांद्रा कुर्ला  कॉम्प्लेक्स येथील कोट्यवधीची जागा मेट्रोसाठी देण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्पामुळे 1 लाख कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात आले. यापैकी काही कोटींचा बोजा  राज्य शासनावर पडला आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे अर्थव्यवस्था बिघडली आहे, गेल्या 20 वर्षांतील सर्वात नीचांकी आर्थिक गुंतवणूक राज्यात झाली आहे.  साखरेला भाव मिळू नये यासाठी केंद्र सरकार विदेशातून साखर आयात करण्यात आली,’ असा आरोप पवार यांनी केला.