Breaking News

केदारेश्‍वर अन्य कारखान्यांच्याबरोबरीने भाव देणार - ढाकणे

अहमदनगर, दि. 25, सप्टेंबर - निसर्गाने चांगली साथ दिल्याने केदारेश्‍वर साखर कारखान्याचा चालू हंगाम यशस्वीपणे हाती घेऊन 4 लाख मेट्रिक टन गाळपाचे  उद्दिष्ट हाती घेऊन ऊस उत्पादकांना अन्य कारखान्याच्याबरोबरीने भाव देण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिली. येथील  केदारेश्‍वर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, की गत दोन हंगामात नैसर्गिक अडचणीमुळे क्षमते प्रमाणे गाळप झाले नसल्याने सर्वाना फटका बसला. मात्र यंदा पावसाने साथ दिल्याने व जायकवाडी  लाभ क्षेत्रात मुबलक उस उपलब्ध असल्याने अडचणीवर मात करून चालू हंगाम जोमाने हाती घेवून सुमारे 4 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचा निर्णय  संचालक मंडळाने घेतला आहे. केदारेश्‍वर म्हाळसाकांत शुगर प्रा ली कंपनी सांगली यांना तीन वर्षासाठी भाडेतत्वावर चालविण्यास देण्यात आला असल्याचे त्यांनी   सांगितले. शासनाचे निर्णय ग्रामीण भागाच्या दृष्टीने चुकीचे ठरले. त्यात कर्जमाफी, नोटाबंदीचा सर्वाधिक मोठा फटका बसून शेतकर्‍यांना मारक ठरला दरम्यान,  जायकवाडी जलाशयात तालुक्याचे हक्काचे राखीव असलेले तीन टीएमसी पाणी उजव्या कालव्यातून शेतीला मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना शेतकरी प्रमोद  विखे यांनी केली.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाने, सर्जराव दहीफळे, प्रमोद विखे, अनिल कांबळे यांनी विविध सूचना केल्या. बंडू बोरुडे, जेष्ठ संचालक  सुरेशचंद्र होळकर, त्रिंबक चेमटे,श्रीरंग गोर्डे, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, यांच्यासह सभासद उस उत्पादक शेतकरी, कामगार यावेळी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.