Breaking News

भगवानगडावरच दसरा मेळावा घेणार - मुंडेंचे संकेत

अहमदनगर, दि. 25, सप्टेंबर - श्री क्षेत्र भगवानगडावरील दसरा मेळावा म्हणजे श्रध्दा व सामाजीक ऐक्याचा संगम साधणारा मेळावा असून येत्या शनिवारी (  दि.30) होणारा दसरा मेळावा गडावर घ्यावा, या लोकभावनेचा निश्‍चित आदर करू, अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी  भगवानगडावर दसरा मेळावा घेण्याचे स्पष्ट संकेत दिले.
बीड येथे दसरा मेळावा समितीचे सदस्य माजी आ. दगडू बडे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अ‍ॅड. दिनकर पालवे, डॉ. ज्ञानेश्‍वर  दराडे, नगरपरिषदेचे गटनेते नंदकुमार शेळके, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे संस्थापक सतीष पालवे, राहुल कारखेले  आदींसह समर्थकांनी ना. मुंडे यांची भेट घेऊन मेळाव्यासाठी निमंत्रण दिले. सर्व कार्यकर्ते दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्याबद्दल ना. मुंडे यांनी स्वागत केले.  काही तरी नवी खेळी डोक्यात ठेवत ती यशस्वी होत असल्याच्या आनंदाच्या वातावरणात मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
याबाबत नगराध्यक्ष डॉ .मृत्युंजय गर्जे व माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी बठकीची त्रोटक माहिती दिली. त्यांनी सांगितले, की मुंडे म्हणाल्या , भगवानगडाचा  विषय सामाजिक ऐक्याशी निगडित आहे. लाखोंच्या संख्येने समाज एकीकडे अन् एक व्यक्ती एकीकडे असे चित्र आहे. समाजाने या गोष्टीचाही विचार करावा . श्रध्दा व  भावना असल्याने गडाबाबत कुणीही अनादर केला नाही. गडावर मेळावा व्हावा, अशी लोकभावना तीव्र आहे. त्याचा आदर निश्‍चित करू.
गावोगावचे कार्यकर्ते याबाबत भेटत आहेत. निवेदने येत आहेत .विविध ग्रामपंचायतीचे ठराव संमत होत आहेत. त्याचा बोध घेतला जावा. गडाबाबत आपण काहीही  नकारात्मक बोललेलो नाही. लवकरच आपण पुढील दिशा जाहीर करू.दरम्यान, भगवान गडावर दसरा मेळावा होणार याबाबतचा निर्णय केवळ औपचारिकता म्हणूनच  राहिली आहे. मेळावा गडावर होतो, की मागील वर्षाप्रमाणेपायथ्याला होतो, या बाबतची मात्र उत्सुकता आहे. पंकजा यांनी मेळावा गडावर होईल, असे सूचक शब्दात  स्पष्ट केले.