पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध
बंगळुरू, दि. 06, सप्टेंबर - बंगळुरू येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या निर्घृण हत्येचा देशभरातून तीव्र निषेध केला जात आहे. ही घटना अतिशय दुर्देवी असून यामुळे मी मुळापासून हादरलोय, अशा शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी दु:ख व्यक्त केले. राजकीय वर्तुळातूनही त्यांच्या हत्येबाबत संताप व्यक्त केला जात आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येची घटना अत्यंत वेदनादायी व दुर्दैवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे’ असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तर कठीण काळ सुरु आहे, ईश्वर लंकेश यांच्या आत्म्याला शांती देवो असे आम आदमी पक्षाच्या नेत्याकडून सांगण्यात आले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या घटनेचा निषेध करत लंकेश या आपल्या मनात कायम जिवंत राहतील असे म्हटले आहे. ’ही घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे ट्विट राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केले आहे. गौरी लंकेश यांना ठार करण्यात आल्याची घटना मन सुन्न करणारी आहे अशा आशयाचे ट्विट ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केले आहे. क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनीही या हत्येचा ट्विटरवरून तीव्र निषेध केला आहे. पत्रकारांविरोधातील सर्व प्रकारच्या गुन्ह्याचा मी तीव्र निषेध करतो, असे त्यांनी नमूद केले. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर आता पत्रकार गौरी लंकेश यांची त्याच पद्धतीने हत्या झाली ही बाब निषेधार्ह आहे अशा आशयाचे ट्विट ज्येष्ठ लेखक आणि कवी जावेद अख्तर यांनी केले आहे.
