Breaking News

जिहे कठापूर योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता

सातारा, दि. 10, सप्टेंबर - शासनाने 11 फेब्रुवारी 1997 रोजी खटाव व माण तालुक्याला वरदान असलेल्या जिहे कठापुर उपसा सिंचन योजना ता. कोरेगाव रु  269.07 कोटी खर्चाला मान्यता दिली व कामही सुरु झाले. परंतु योजनेच्या मान्यते एवढा खर्च झाल्याने 2013-14 दरसूची प्रमाणे रु 1085.54 कोटी व गेल्याने  सुधारीत प्रशासकीय मान्यतेशिवाय पुढे खर्च करता न आल्याने प्रकल्पाचे काम बंद राहिले होते.
प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता अहवाल शासनाकडे 11 नोव्हेंबर 2010 मध्ये प्रथम सादर करण्यात आला होता. तसेच 12 एप्रिल 2012 रोजी प्रधान  सचिव(नियोजन) यांचेकडे सु.प्र.मा बाबत सादरीकरन होऊन मंजुरीसाठी प्रस्ताव मंत्रिमडळासमोर ठेवण्यात आला. परंतु मान्यता मिळाली नाही.
गेली 7 वर्षे सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी योजनेचे काम रखडले होते. पालकमंत्री श्री. विजय शिवतारे यांनी गेल्या 3 वर्षापासुन मुख्यमंत्री देवेद्रंजी  फ़डणवीस,अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसुलमंत्री चद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून पत्राव्दारे व समक्ष भेटून  सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तसेच दि. 7 सप्टेंबर 2017 रोजी झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्प  समाविष्ठ करण्यासाठी पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी विशेष बाब म्हणून पत्राव्दारे कळविल्यानंतर समितीने बैठकीमध्ये समावेश केला. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत जिहे कठापूर प्रकल्पास रु. 1085.54 कोटी किंमतीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली  व ख-या अर्थाने गेली 3 वर्षे पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले.
प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होऊन प्रकल्प पूर्ण होईल. जिहे कठापुर उपसा सिंचन योजनेचा उद्भ व कृष्णा नदीवर  कोरेगाव तालुक्यातील कठापूर गावाजवळ असून या योजनेव्दारे एकूण 3 टप्प्यामध्ये 3.17 अ.घ.़फु. पाणी उचलून त्या व्दारे सातारा जिल्ह्यातील अवर्षण प्रवण  भागातील खटाव तालुक्यातील 40 गावातील 11700 हे. व माण तालुक्यातील 27 गावातील 15800 हेक्टर क्षेत्र असे एकूण 67 गावातील 27500 हे. क्षेत्रास  सिंचनाचा लाभ होणार आहे हे तालुके दुष्काळमुक्त होणार आहेत.
मागील 3 वर्षामध्ये प्रकल्पास निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. मागील 3 वर्षामध्ये एकूण रु.138 कोटी  निधी शासनाकडून मिळवून दिला आहे. त्यामुळे कृष्णा नदीवरील बॅरेज 60 % व टप्पा क्रं 1 पंपगृहचे काम 90% पूर्ण झाले. वेळोवेळी प्रकल्पास भेट देऊन व  अधिका-याच्या सोबत बैठका घेऊन अडचणी समजावून घेऊन त्या सोडवल्या. त्यामुळे प्रकल्प आज पूर्णत्वाकडे जात आहे.