Breaking News

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस..

बुलडाणा, दि. 22, सप्टेंबर - छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना 2017 अंतर्गत शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात येत आहे. या योजनेतंर्गत अर्ज भरण्याचा  उद्या 22 सप्टेंबर 2017 शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अर्ज न भरलेल्या शेतकर्‍यांनी त्वरित आपले सरकार केंद्र, महा ई सेवा केंद्र व सीएससी केंद्रावर जावून अर्ज  भरावेत. तसेच  कर्जमाफी अर्जामध्ये सर्व बँकाकडील शेती कर्जाची माहिती द्यावी. ज्या शेतकर्‍यांनी विविध बँकांचे शेती कर्ज काढलेले आहे, त्यांनी सर्व बँक कर्ज  खात्यांची माहिती अर्जात भरणे अत्यावश्यक आहे. यामध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचाही समावेश आहे. शेतकर्‍यांनी ज्या बँकेचे कर्ज घेतले आहे, त्या बँकेकडे  आधार कार्ड व इतर माहिती सादर करावी.
शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेव्यतिरिक्त इतर बँकाकडून कर्ज घेतले असले तरी त्यांना एकूण 1.50 लक्ष रूपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत  जास्त कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी शेतकर्‍यांनी जिल्हा बँक व इतर बँकेकडे आधार कार्ड आणि के.वाय.सी कागदपत्रे द्यावीत.
अशी माहिती भरण्यासाठी शेतकर्‍यांना नव्याने अर्ज भरण्याची गरज नसून त्याच अर्जामध्ये एडीट ऑप्शनद्वारे ही माहिती भरावी. अर्ज सादर करताना सर्व थकीत  खातेदारांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक व ग्रामीण बँक अशा सर्व प्रकारच्या वित्तिय संस्थांकडून घेतेलल्या सर्व प्रकारच्या कर्जाची  माहिती सादर केलेली नसल्यास ती सादर करावी. घेतलेल्या सर्व कर्जाची माहिती सादर केलेली नाही, असे आढळल्यास अशा खातेदारांवर नियमानुसार कारवाई  करण्यात येणार आहे.
अर्ज सादर करताना सर्व बँकाकडून घेतलेल्या संपूर्ण कर्जाची माहिती सादर करणे अनिवार्य आहे. तरी शेतकर्‍यांनी सर्व कर्ज खात्यांची माहिती ऑनलाईन् अर्जात नमूद  करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात व जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण  यांनी केले आहे.