Breaking News

केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले आज बुलडाण्यात

कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन : रुईखेड मायंबा येथील पीडितेची भेट घेतील काय?

बुलडाणा, दि. 22, सप्टेंबर - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ)च्या वतीने शहरातील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात दि.22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता  कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदर मेळाव्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले उपस्थित राहून मार्गदर्शन करणार  आहेत. गर्दे वाचनालयात होवू घातलेल्या कार्यकर्ता मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रिपाइं जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी केले आहे.
 ना.आठवले हे मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात येत असून रिपाइं केंद्रात आणि राज्यात भाजप-सेनेसोबत सत्तेत आहे. भाजप-सेनेत दरी  निर्माण झाल्याने जिल्ह्यातील रिपाइं नेत्यांनी भाजप नेत्यांना मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेतले. मात्र शिवसेनेला सदर कार्यक्रमापासून डावलण्यात येवून खुद्द  खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवत सह सर्वच सेना नेत्यांना डावलल्याने जिल्ह्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. तर या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भुपेशजी थुलकर, प्रमुख अतिथी म्हणून कृषी व फलोत्पादन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर, जि.प.अध्यक्ष  उमाताई तायडे, भाजप जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे, आ.चैनसुख संचेती, आ.डॉ.संजय कुटे, आ.आकाश फुंडकर, योगेंद्र गोडे, माजी आमदार अनिल गोंडाने, विदर्भ  प्रदेशाध्यक्ष सुधाकर तायडे, शिवाजी काळे, जगदेवराव बाहेकर, अ‍ॅड.व्ही.डी.पाटील, उल्हासराव देशपांडे, तेजराव वानखडे, त्र्यंबकराव सिरसाट, सुनिल अवचार,  उषाताई जवंजाळ, गजानन कांबळे, डॉ.झंवर, नंदू अग्रवालसह जिल्हाभरातील भाजप व रिपाइंच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या कार्यकर्ता मेळाव्यात नाा.आठवले हे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन तर करणार. परंतु रुईखेड मायंबा येथे जातीयवाद्यांनी चर्मकार समाजातील कुटुंबाला  प्रचंड मारहाण करुन 35 वर्षीय महिलेला 30 ते 40 गावगुंडांनी विवस्त्र करुन धिंड काढली. बेशुद्ध होईपर्यंत अत्याचार केले. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात गाजली.  बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर चर्मकार समाजातील 50 पेक्षा जास्त संघटना एकत्र येवून माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, बबन घोलप, इंजि.चंद्रप्रकाश  देगलूरकर, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार बाबुराव माने, लक्ष्मणराव घुमरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला. तर आमदार राहुल बोंद्रे,  आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सदर प्रकरण काही काळ लावून धरले. ही घटना मातृतिर्थ जिजाऊं व ताराबाई शिंदे यांच्या जिल्ह्यात घडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात  चिड निर्माण होवून पेटून उठला होता. प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने करण्यात आली. याची दखल म्हणून पीडित महिलेला मुख्यमंत्री फंडातून पाच लाख रुपये मंजूर  करण्यात आले. तर माजी खासदार भालचंद्र मुनगेकर, खा.सुप्रिया सुळे, खा.अमर साबळे, आ.भाऊसाहेब कांबळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री राजकुमार बडोले,  अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती सी.एल.थूल, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर, माजी  मंत्री डॉ.नितीन राऊत, बबन घोलप, अशोक कानडे, रविकीरण घोलप इत्यादी दिग्गज नेत्यांनी सांत्वनपर भेट देवून सामाजिक समतोल अबाधित राखण्याचा प्रयत्न  केला. परंतु त्यावेळी भाजपप्रणीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर व ना.आठवले यांनी कोणतीही दखल घेतली नाही. परंतु योगायोगाने  ना.आठवले मंत्रीपदाचा लवाजमा घेवून जिल्ह्यात येत आहेत. त्यांच्याकडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद आहे. म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारुन ते रुईखेड  मायंबा येथील अन्याय अत्याचारग्रस्त पीडित महिलेला व कुटुंबियांना सांत्वनपर भेट देतील काय? असाही प्रश्‍न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.