Breaking News

कराड येथील दोन पतसंस्थांवर आयकर विभागाचे छापे

कराड, दि. 25 (प्रतिनिधी) : कराड शहरातील दोन प्रतिष्ठित पतसंस्थांवर आयकर खात्याच्या पथकाने छापे टाकून तपासणी सुरू केली आहे. संस्थांवर छापे  पडल्याने संचालकांसह ठेवीदारांच्यात खळबळ उडाली होती. संस्थांची तपासणी सुरू असून याबाबत स्पष्ट माहिती सांगता येणार नसल्याची प्रतिक्रिया आयकरच्या  अधिकार्‍यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दत्त चौक व चावडी चौकात दोन वेगवेगळ्या पतसंस्था असून कराड शहरासह परिसरातील प्रतिष्ठित व्यावसायिक या संस्थांमध्ये संचालक आहेत. भागातील मोठमोठे  व्यापारी, व्यावसायिक संस्थेचे ठेवीदार असून या प्रतिष्ठित संस्थांची गेली दोन दिवसांपासून आयकर विभागाच्या अधिकार्‍यांकडून तपासणी सुरू आहे.
या दोन्ही संस्थांमध्ये आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी दिवसभर गोपनीय पध्दतीने तपासणी करत पदाधिकारी, अधिकार्‍यांकडे चौकशी सुरू केल्याची चर्चा होती. या  चर्चेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. दोन्ही पतसंस्थांच्या संचालकांसह कायदेशीर सल्लागारांनी संस्थेच्या आवारात ठाण मांडले होते. तपासणी करणार्‍या  अधिकार्‍यांशी पत्रकारांनी संपर्क साधला असता ते म्हणाले, दोन्ही पतसंस्थांची नियमित तपासणी सुरू आहे. या तपासणीचा अहवाल गोपनीय ठेवण्यात येतो.   दरम्यान, पतसंस्थांची तपासणी सुरू झाल्याचे वृत्त समजताच ठेवीदारांसह संस्थांशी संबंधित लोकांनी परिसरात गर्दी केली. गर्दी झाल्याने संस्थेच्यासमोरील रस्त्यांवर  वाहतूक कोंडी होऊन गोंधळ उडाला होता. पोलिसांनी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात  आले.