सिमेंटचे रिकामे पोते जाळणे घातक, मुंबई प्रलयालाही कारण प्लास्टिकच
सोलापूर, दि. 01, सप्टेंबर - प्लास्टिक पोत्यांमध्ये पॅकबंद असणारे सिमेंट हे घरबांधकामासाठी अगदी अनिवार्य असणारे साहित्य आहे. सिमेंट वापरल्यानंतर रिकामी पोती बांधकाम स्थळीच इकडे तिकडे पसरलेली असतात. या रिकाम्या प्लास्टिक पोत्यांचे पुढे होते काय? बांधकाम पूर्ण होईपर्यंत साठलेल्या पोत्यांचा कचरा तर भंगारमध्येही जात नाही. कारण या पोत्यांना पुनर्निर्मितीमूल्य नाही. म्हण्ूनच चुलीतील उत्तम जळण म्हणून या पोत्यांचा वापर होतो आहे, जे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांचा उपयोग नंतर काहीच होत नाही. भंगारमध्येही ते घेतले जात नाही. त्याचा पुनर्वापर शून्य आहे. यामुळे जळण म्हणून या पोत्यांचा वापर सहजी होताना दिसतो. कोठेही सहज उपलब्ध होत असल्याने कचर्यात टाकण्यापेक्षा जळण म्हणून वापर कोणालाही योग्य वाटेल. पण पर्यावरण तज्ज्ञांच्या मते प्लास्टिक जाळण्यामुळे अत्यंत घातक असे विषारी वायू तयार होतात. प्लास्टिकचे निर्मूलन करण्यासाठी प्रक्रिया करावी लागते. मात्र ही प्रक्रिया मोठी खर्चिक आहे. बंद खाणी बुजवण्यासाठी प्लास्टिक वापरता येईल. मात्र हे प्लास्टिक नैसर्गिक जलस्रोतात जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. शिवाय प्लास्टिकवर प्रक्रिया करावी लागेल. हा उपायही खर्चिक आहे. आधुनिक राहणीमानामुळे प्लास्टिकचा वापर वाढतो आहे. आकर्षक पॅकबंद वस्तू घेणे ’सिम्बॉल स्टेटस’ बनते आहे. साधी भाजी आणण्यासाठी जातानाही रिकाम्या हाताने जाऊन प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर होतो आहे. ऑनलाइन कोणतीही वस्तू खरेदी केली, तरी त्यातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकमधील पॅकिंग येतेच. दुधााच्या पिशव्या जाळायच्या नाहीत. कचर्यात टाकायच्या नाहीत, असा नियम प्लास्टिक कचर्यासाठी लागू असतो. पण प्लास्टिकबाबत नेमके हेच केले जाते. प्लास्टिक कचर्यातून पुन्हा प्लास्टिक निर्माण करणे, हा यावर उपाय नाही. तर पूर्णपणे वापर थांबवणे हाच प्रभावी उपाय ठरू शकतो, असे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. केवळ वेस्टनासाठी, पॅकिंगसाठी प्लास्टिकचा वापर अनिवार्य होतो आहे. वापर आणि उत्पादन तर दिवसेंदिवस बेसुमार पद्धतीने वाढते आहे. मग या प्लास्टिक कचर्याचे निर्मूलन करायचे तरी कसे? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. यावर आपल्या राहणीमानाच्या सवयी बदलणे, हाच एक उपाय सध्या तरी दृष्टिपथात आहे.