Breaking News

माध्यमिक शिक्षक सोसायटीने अन्य घटकांना मदत करावी - पवार यांचे आवाहन

माध्यमिक शिक्षक बँकेचा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात  

अहमदनगर, दि. 25, सप्टेंबर - शिक्षकांवर सावकाराच्या दारात जाण्याची वेळ येऊ नये, शिक्षकांना सन्मानाने जगता यावे, यासाठी माध्यमिक शिक्षकांच्या या  सोसायटीचे कार्य प्रशंसनीय आहे. या संस्थेच्या सभासदांच्या माध्यमातून  35 लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. गुजरात आणि कर्नाटक राज्यातील बँकांच्या  बरोबरीने ही सोसायटी कार्यरत आहे. सहकार चळवळ ही सामान्य माणसाला एक प्रकारची शक्ती देणारी चळवळ आहे. त्यामुळे या सोसायटीने नियमांच्या अधीन  राहून शिक्षकांशिवाय अन्य घटकांना मदत करण्याचे कार्य करावे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. 
येथील यशवंतराव चव्हाण सहागृहात पार पडलेल्या माध्यमिक शिक्षक बँकेच्या अमृतमहोत्सवी समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रा. राम शिंदे होते.  यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी आ. चंद्रशेखर कदम, आ. संग्राम जगताप. माजी आ. दादाभाऊ कळमकर, माजी आ. पांडुरंग अभंग, माजी महापौर  अभिषेक कळमळकर,  माजी आ. चंद्रशेखर घुले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुशा गुंड, जिल्हा परिषदेचे माजी  उपाध्यक्ष राजेंद्र फाळके, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, शिक्षक बँकेचे नेते प्रा. भाऊसाहेब कचरे, प्रा. अप्पासाहेब शिंदे, राजेंद्र लांडे  आदींसह संस्थेचे शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवार म्हणाले, की सहकार ही विकासाची गंगोत्री असून तिचा उगम अहमदनगरमधून होतो. या क्षेत्रात  सुरुवातीपासून काम करणार्‍या सर्वच सहकारमहर्षींचे योगदान मोठे प्रेरणादायी आहे. नगरच्या कारखानदारीमुळे खेडोपाडी राहत असलेल्या माणसांत उद्योजगता निर्माण  झाली. यामुळे सामान्यांचे अर्थकारण उंचावले आहे. सत्ता असो नसो याचा विचार न करता शिक्षकांच्या प्रश्‍नात लक्ष घालू. शिक्षणाचा दर्जा उंचवला पाहिजे. शिक्षकाचे  आचरण चांगले असेल तर पुढची पिढी घडविण्याचे कार्य घडते. अन्य खात्यापेक्षा शिक्षण खाते अत्यंत संवेदनशील आणि महत्वपूर्ण आहे. या खात्याच्या प्रश्‍नासाठी  सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन पवार यांनी यावेळी दिले.