Breaking News

पुणे - नाशिक रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण पूर्ण

प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे, खासदार आढळराव पाटलांची माहिती 

अकोले, दि. 25, सप्टेंबर - पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण पूर्ण होऊन या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल नवी दिल्ली येथे रेल्वे बोर्डाकडे मंजूरीसाठी  पाठविण्यात आला आहे. जानेवारी 2018 मध्ये या कामाची निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेचे जनरल मॅनेजर डी. के. शर्मा व मुख्य अभियंता  राजीव मिश्रा यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिली.
दि. 22 सप्टेंबर रोजी जनरल मॅनेजर, मध्यवर्ती रेल्वे, पुणे यांचे कार्यालयात पुणे व सोलापूर मंडळातील सर्व खासदार व रेल्वे बोर्डाचे अधिकारी यांची बैठक पार  पडली. यावेळी पुणे-नाशिक रेल्वे मार्गाबाबत रेल्वेचे मुख्य अभियंता राजीव मिश्रा व जनरल मॅनेजर डी. के. शर्मा यांच्याशी खासदार आढळराव पाटील यांनी चर्चा  केली. यासंदर्भात खासदार आढळराव पाटील म्हणाले की, पुणे-नाशिक महामार्गाचे संपूर्ण सर्व्हेक्षण ऑगस्ट 2017 च्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाले असून या  कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून नवी दिल्ली येथे रेल्वे बोर्डाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. तसेच डिसेंबर 2017 अखेर सविस्तर  प्रकल्प अहवालाची छाणणी होऊन जानेवारी 2018 पर्यंत या रेल्वे मार्गाचे टेंडर निघून प्रत्यक्षात कामास सुरुवात होईल अशी माहिती या बैठकीत रेल्वेचे मुख्य  अभियंता व जनरल मॅनेजर यांनी मला दिली.
सन 2004 पासून प्रत्येक वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्पीय चर्चेत भाग घेत असताना माझ्याकडून पुणे-नाशिक व कल्याण-माळशेज-नगर या दोन्ही  मार्गांची सातत्याने मागणी असायची. अनेकदा लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासाच तसेच शून्य प्रहरामध्ये आणि औचित्याचा मुद्दा म्हणून हा प्रश्‍न मी आजवर अनेकदा  लावून धरला. यूपीए दोन सरकारच्या काळामध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी 2013 च्या अर्थसंकल्पात पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला तत्वशः मंजूरी  देऊन सदर प्रस्ताव नियोजन आयोगाकडे पाठविण्यात आला होता. मात्र दुर्देवाने नियोजन आयोगाने त्याला मंजूरी दिली नाही. युती सरकार सत्तेत आल्यावर 2015  च्या अर्थसंकल्पामध्ये या मार्गाला मंजूरी मिळेल अशी अपेक्षा रेल्वेमंंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे केली होती. दुर्देवाने 2015 मध्ये सुरेश प्रभुंनी या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले.  नंतरच्या वर्षभरात रेल्वेमंत्री, रेल्वेबोर्डाचे चेअरमन इत्यादींकडे सातत्याने पाठपुरावा केला म्हणून 2016 च्या अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंनी या प्रकल्पास मंजूरी  दिली व 2425 कोटी रकमेच्या खर्चास मान्यता दिली.
आता या प्रकल्पाचे बजेट कदाचित वाढून तीन कोटींच्याही पुढे जाईल. सदर रेल्वे प्रकल्प महाराष्ट्र राज्य व भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त भागीदारीमध्ये विशेष व्हेईकल  कंपनी स्थापन करुन राबविला जाणार आहे. कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याआगोदर पुणे-नाशिक मार्गावरील सर्व खासदार व आमदारांची एकत्रित बैठक घेऊन रेल्वे  अधिकारी तपशीलवार माहिती देतील.
हा रेल्वे प्रकल्प मंजूर होण्यासाठी मी जनतेला दिलेला शब्द खरा केला याचा मला आनंद वाटतो. आगामी काळात कल्याण-माळशेज-नगर रेल्वेमार्ग मंजूरीसाठी माझे  प्रयत्न असणार आहेत. सत्ता असली काय किंवा नसली काय माझ्या दृष्टीने माझ्या शिरूर लोकसभा मतदार संघाचा विकास  होणे महत्वाचे आहे. गेल्या काही वर्षात  खेड-सिन्नर रस्ता चौपदरीकरण, खेड-नाशिक फाटा रस्ता सहापदरीकरण, देहू-आळंदी पालखी मार्ग, ओझर-लेण्याद्री-बनकर फाटा-  तळेघर-भीमाशंकर-वाडा-खेड रस्ता प्रकल्प, अष्टविनायक महामार्ग जोडणी प्रकल्प यासारखे अनेक मोठे प्रकल्प मंजूर करून आणण्यात मला यश आले आहे.  लवकरच ही सर्व कामेदेखील पूर्ण होणार आहेत. जोपर्यंत येथील जनता माझ्या पाठीमागे आहे तोपर्यंत मी या भागाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडे प्रयत्न  करून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी अहोरात्र काम करीत राहणार आहे.