काश्मीर : दगडफेक करणा-या तरूणांना ‘व्हॉट्सप’वरून मिळतात सूचना - तपास यंत्रणा
नवी दिल्ली, दि. 06, सप्टेंबर - काश्मीरमधील संवेदनशील परिसरात आणि खो-यात दगडफेक करणा-या तरूणांना ‘व्हॉट्सअप’च्या माध्यमातून सूचना देण्यात येतात आणि ते व्हॉट्सअप ग्रूपमार्फत त्या सूचना इतर समुहांपर्यंत पोहोचवतात, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला सुमारे सहा महिन्यांच्या तपासात मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांत दगडफेक करणा-या तरूणांच्या समुहाचे नेतृत्व व प्रतिनिधित्व करण्यासंदर्भात संशयित असलेले 117 लोक व्हॉट्सअपच्या विविध ग्रुपचे सदस्य आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या दगडहल्लेखोरांना सूचना देणारे एकूण 79 व्हॉट्सअप ग्रुप कार्यरत आहेत आणि त्यापैकी बहुतांश ग्रुपचे प्रमुख (डमिन) हे पाकिस्तानचे आहेत. या 79 ग्रुपमध्ये एकूण 6 हजार 386 मोबाईल क्रमांक सहभागी आहेत. त्यापैकी सुमारे 1 हजार मोबाईल क्रमांक हे पाकिस्तान आणि आखाती देशांत कार्यरत आहेत, तर उर्वरित 5 हजार 386 मोबाईकल क्रमांक हे काश्मीर खो-यात व आसपासच्या राज्यांत कार्यरत आहेत, असे तपासात स्पष्ट झाले आहे.
