Breaking News

सत्तेतून बाहेर पडण्याच्या शिवसेना नेतृत्वाच्या केवळ डरकाळ्या- जयंत पाटील

सांगली, दि. 23, सप्टेंबर - केंद्र व राज्यातील सत्तेतून बाहेर पडण्याच्या शिवसेना नेतृत्वाच्या केवळ डरकाळ्याच सुरू आहेत. कारण, आत एक, बाहेर एक करणार्या  शिवसेना नेतृत्वाची सध्याची अवस्था लांडगा आला रे आला, अशीच झाली आहे, अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आमदार जयंत  पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत केली. शिवसेना नेतृत्व ज्यावेळी खरोखरच सत्तेतून बाहेर पडण्याची कृती करेल, त्याचवेळी जनता त्यांच्यावर विश्‍वास ठेवेल,  असा टोलाही त्यांनी लगावला.
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्रमानिमित्त सांगली येथे आलेले जयंत पाटील पत्रकार बैठकीत बोलत होते. या पत्रकार बैठकीस राष्ट्रवादी  काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष नगरसेवक संजय बजाज, सांगली महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी व विष्णू माने आदी  उपस्थित होते.
केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाविरोधात शिवसेना नेतृत्वाची भूमिका सत्ता स्थापनेपासून कायमच आत एक, बाहेर एक अशी राहिलेली आहे. सत्तेतून बाहेर  पडण्याची शिवसेना नेतृत्वात धमकच नाही, अशी टीका करून जयंत पाटील म्हणाले, की केवळ सत्तेतून बाहेर पडण्याच्या डरकाळ्या फोडणार्या शिवसेना नेतृत्वावर  आता जनतेचा विश्‍वास राहिलेला नाही. राज्यात जशा घटना घडतील, तशा पध्दतीची भूमिका शिवसेना नेतृत्व घेत आहे.
राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी भाजपविरोधी भूमिका घ्यायचीही आहे, पण सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देताना लाजही वाटत आहे. शिवसेना नेतृत्वाकडून सत्तेतून  बाहेर पडण्याच्या केवळ वल्गनाच होत आहेत. आता शिवसेना नेतृत्वाकडून थेट प्रत्यक्ष कृती झाल्याशिवाय राज्यातील सर्वसामान्य जनता त्यांच्या या डरकाळ्यांवर  कदापिही विश्‍वास ठेवणार नाही. कारण, सध्या शिवसेनेची सत्ताकारणातील अवस्था लांडगा आला रे आला, या गोष्टीसारखी झाली आहे. परिणामी जर- तर अशा  राजकीय घडामोडींची स्वप्ने पाहण्यात कोणताही अर्थ नाही, अशी टिप्पणीही जयंत पाटील यांनी केली.
जनतेतून थेट सरपंच व महापौर निवडीबाबत जयंत पाटील म्हणाले, की थेट सरपंच निवडीमुळे गावच्या विकासात मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.  कारण, ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच एका राजकीय पक्षाचा अन सदस्य दुसर्या राजकीय पक्षाचे निवडून आले, तर गावच्या विकासालाच पूर्णपणे खो बसणार आहे.  याची अनुभूती थेट नगराध्यक्ष निवडणूक झालेल्या अनेक नगरपालिका- नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना येऊ लागली आहे.
तशीच परिस्थिती थेट महापौर निवडीची होणार आहे. सांगली महापालिका महापौराच्या कार्यक्षेत्रात दोन विधानसभा मतदारसंघ येणार आहेत. त्यातून एकमेकाच्या  अधिकार वर्चस्वाचाही प्रश्‍न निर्माण होणार आहे. सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरात इतक्या तोलामोलाचा उमेदवारही राजकीय पक्षांना मिळणे अवघड होणार  आहे. त्यात दोन विधानसभा मतदारसंघातील लोकसंख्येची मान्यता घेऊन महापौर होणार्याला तितक्या ताकदीचे अधिकारच नसतील, तर तो निवडून येऊन करणार  तरी काय, असा प्रश्‍न जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत, हीच परिस्थिती यंदाच्या निवडणुकीतही कायम राहणार आहे, असा विश्‍वास व्यक्त  करून ते म्हणाले, की अनेक गावात राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ ताकदवान असल्याने कोणत्याही निवडणुकीत थेट पक्षीय सहभाग घेतला जाणार नाही. भविष्यात सर्वाधिक  सरपंच निवडून आले, तरच सरपंचांना जादा अधिकार मिळणार आहेत. अन्यथा, परिस्थिती जैसे थे च राहणार आहे. भाजपचे सरकार ग्रामपंचायत निवडणूक  निकालानंतर वातावरण बघूनच निर्णय घेणार आहे. गत दोन ते चार निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे केवळ सोशल मिडीयावरील लाटेमुळेच मिळालेले आहे.  मात्र ही परंपरा आता ग्रामपंचायत निवडणुकीत पूर्णपणे खंडीत झालेली दिसेल.
राज्यातील भाजप नेतृत्वाकडे ठोस निर्णय घेण्याची दूरदृष्टी नाही. केवळ सोशल मिडीया व अन्य प्रसिध्दी माध्यमांतून प्रकाशझोतात राहण्याचेच भाजप नेतृत्वाचे ठोस  नियोजन आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही लक्ष्य करणार असल्याच्या नारायण राणे यांच्या वक्तव्याबाबत विचारता ते म्हणाले, की  नारायण राणे यांच्याशी आपले व्यक्तिगत मैत्रीपूर्ण चांगले संबंध आहेत. त्यांनी काँग्रेस त्यागानंतर अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही अथवा राष्ट्रवादी  काँग्रेसबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. नारायण राणे ज्यावेळी बोलतील, त्यावेळी मतप्रदर्शन करणे संयुक्तिक ठरेल. नारायण राणे यांनी आपल्या विधान परिषद  सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला तरी एक विधानसभा सदस्यत्व घरी ठेवलेले आहे. त्यातून ते कोणाला मदत करीत आहेत, हे निश्‍चितपणे स्पष्ट होते. कदाचित,  आपणाला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते. त्यामुळेच त्यांना एका आमदारकीचा राजीनामा देऊ नका, असे सांगण्यात आले असावे, अशी मिश्किल टिप्पणीही जयंत  पाटील यांनी केली.