Breaking News

मराठा क्रांतीकारी मोर्चाच्या वर्षापुर्तीनिमित्त साता-यात पुन्हा मराठ्यांचा एल्गार

सातारा, दि. 23, सप्टेंबर - मराठ्यांची राजधानी असलेल्य्याने गतवर्षी 3 ऑक्टोबरला ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाची त्सुनामी अनुभवली होती. न भूतो न  भविष्यती अशा झालेल्या या त्सुनामीने मराठ्यांची एकत्रित ताकद प्रथमच दाखवून दिली. या क्रांतीकारी घटनेला एक वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने येत्या दि.  3 ऑक्टोबरला साता-यात सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने मेळावा होणार आहे. या मेळाव्यात शासनाने दिलेल्या प्रत्येक आश्‍वासनाची चिकित्सा केली जाणार  आहे.
कोपर्डी घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर थांबवून कायद्यात बदल करावा, मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावे यासह  विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने राज्यभर 57 मोर्चे काढले. मुंबईतील रेकॉर्डब्रेक महामोर्चावेळी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या  शिष्टमंडळाला काही आश्‍वासने दिली होती. मात्र, त्यावरही समाधानकारक कार्यवाही झाली नसल्याने मराठा समाजामध्ये संतापाची लाट आहे.
सातार्यात गतवर्षी 3 ऑक्टोबरला निघालेल्या मोर्चाने इतिहास रचला होता. राजधानी सातार्याने मराठा मोर्चाचा तो क्रांतीकारी क्षण डोळ्यात साठवताना आणखी एका  इतिहासाची नोंद केली होती. प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्ते व गल्लीबोळातही मराठ्यांची त्सुनामी आली होती. मनात मराठा, डोळ्यांत मराठा, रस्त्यावर मराठा,  बघावा तिकडं मराठाच, मराठा दिसत होता. सकल मराठा समाजाच्या प्रवाहाचा अभूतपूर्व महासागर राजधानी साता-याने अनुभवला होता. या घटनेला येत्या 3  ऑक्टोबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने साता-यातील सातारा - कोरेगाव रोडवरील स्वराज मंगल कार्यालयात दुपारी 1 वाजता मराठा मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, कौशल्य  विकास, व्यवसाय मार्गदर्शन, सैन्य / पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना, कुणबी प्रमाणपत्र कार्यशाळा, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ,  प्रस्तावित शासकीय मराठा विद्यार्थी वसतीगृह या विषयावर सविस्तर माहिती दिली जाणार असून मराठा समाजातील तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे  जिल्ह्यातील सकल मराठा समाजबांधवांनी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.