Breaking News

मानधन वाढीचा सरकारचा प्रस्ताव अंगणवाडी कृती समितीने फेटाळला ; संप सुरूच राहणार

मुंबई, दि. 23, सप्टेंबर - अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार रु. वाढ करण्याचा सरकारचा प्रस्ताव अंगणवाडी कृती समितीने फेटाळला आहे. सरकारने  आमच्या मागणीनुसार अंगणवाडी सेविकांचे मानधन 9 हजार 500 रु. इतके करावे . ही मागणी मान्य होईपर्यंत आमचा संप सुरूच राहणार असल्याचे कृती समितीचे  एम . ए. पाटील यांनी आज पत्रकारांना सांगितले . 
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संपावर गेलेल्या अंगणवाडी सेविकांपुढे मानधन वाढीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार अंगणवाडी सेविकांचे मानधन 5 हजार रु.  वरून 6 हजार 500 रु . , मदतनिसांचे मानधन 2 हजार 500 रु. वरून 3 हजार 500 रु. तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 3 हजार 250 रु . वरून 4  हजार 500 रु. करण्यात येईल असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते .तसेच अंगणवाडी सेविकांना सध्यापेक्षा दुप्पट भाऊबीज देण्यात येईल असेही पंकजा मुंडे  यांनी जाहीर केले होते . मात्र कृती समितीने सरकारचा हा प्रस्ताव तातडीने फेटाळून लावला . आम्ही केलेल्या मागणीनुसार अंगणवाडी सेविकांचे मानधन 9 हजार  500 रु. करावे . त्या शिवाय संप मागे घेतला जाणार नाही , असे कृती समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले . मात्र या सूत्रानुसार आमची सरकारशी चर्चा  करण्याची तयारी असल्याचेही कृती समितीकडून सांगण्यात आले.
दरम्यान शिवसेनेने या संपाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे . काल कृती समितीचे एम.ए . पाटील , शुभा शमीम आणि भगवान देशमुख यांनी  शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली . या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मंगळवारी तातडीची बैठक बोलावण्यात आली होती . मात्र वित्त विभागाने  मानधनवाढीचा प्रस्ताव फेटाळल्याने संप सुरूच राहिला.