Breaking News

भूमिगत वीजवाहिनी तुटली; पुणेकरांना भारनियमनाचा फटका

पुणे, दि. 23, सप्टेंबर - दत्तवाडी येथील फरशी पुलाजवळील ओढ्याची जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करत असताना महापारेषण कंपनीची 132 केव्ही क्षमतेची  भूमिगत वीजवाहिनी तुटली. परिणामी महावितरणच्या 6 उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडीत झाला. यामुळे शहरातील मोठ्या भागातील वीजपुरवठा दुपारी अडीचच्या  सुमारास विस्कळीत झाला. याचा सुमारे अडीच लाख वीजग्राहकांना फटका बसला आहे.
दरम्यान, महावितरणकडून इतर उपकेंद्रांद्वारे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि 70 ते 80 मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने या  सर्व परिसरात पुढील 2 दिवस नाईलाजास्तव 3 ते 4 तासांचे चक्राकार पद्धतीने तात्पुरते भारनियमन करण्यात येणार आहे.
महापारेषणच्या पर्वती 220 केव्ही उपकेंद्रातून भूमिगत वीजवाहिनीद्वारे रास्तापेठ 132 केव्ही जीआयएस उपकेंद्राला वीजपुरवठा होतो. या उपकेंद्रातील आऊटगोईंग  वाहिन्यांद्वारे महावितरणच्या सेंटमेरी, कसबा पेठ, मंडई, लुल्लानगर, गुलटेकडी आणि रास्तापेठ या 6 उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यात येतो. परंतू बुधवारी रात्री  दत्तवाडी येथील फरशी पुलाजवळील ओढ्यात जेसीबीने सुरू असलेल्या साफसफाईच्या कामात सिमेंटचे काँक्रीट उखडण्यात आले आणि महापारेषणच्या भूमिगत  वीजवाहिनीचे नुकसान झाले. त्यानंतर रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे वाहिनीमध्ये आर्द्रता वाढली आणि आज दुपारी अडीचच्या सुमारास या भूमिगत वाहिनीचा  स्फोट झाला. त्यामुळे महापारेषणच्या रास्तापेठ 132 केव्ही जीआयएस उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला.
परिणामी या उपकेंद्रांतून महावितरणच्या 6 उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शहराच्या मध्यवस्तीमधील रास्तापेठ, कसबा पेठ, भवानी पेठ,  बुधवार पेठ, नवीपेठ, सदाशिव पेठ, गंजपेठ यासह सर्व पेठा, लुल्लानगर, कोंढवा, कॅम्प, गुलटेकडी, मंडई, मुकुंदनगर, लक्ष्मीरोड, सिंहगड रोड, रहेजा गार्डन,  सॅलीसबरी पार्क, गुलटेकडी, मार्केट यार्ड, शंकरसेठ रोड, स्वारगेट, जिल्हाधिकारी कार्यालयाचा काही परिसर, पर्वती आदी परिसरातील सुमारे अडीच लाख ग्राहकांचा  वीजपुरवठा विस्कळीत झाला.
महावितरणच्या 6 उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद असल्याने सुमारे 70 ते 80 मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करून या संबंधीत परिसरातील सर्व वीजग्राहकांना सुरळीत  वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न महावितरणकडून युद्धपातळीवर सुरू आहेत. इतर उपकेंद्रांमधून पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात  आली. तथापि विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने काही परिसरांमध्ये नाईलाजास्तव चक्राकार पद्धतीचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. खोदकामात  नादुरुस्त झालेली महापारेषणची वीजवाहिनी विशिष्ट प्रकारची आहे. वाहिनीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारा जॉईंट चेन्नई येथून विमानाने मागविण्यात आला आहे.  शुक्रवारी या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम महापारेषणकडून सुरू होईल.