Breaking News

भुसावळला त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे धम्मक्रांती महाशिबिर

जळगाव, दि. 23, सप्टेंबर - भुसावळ शहरातील त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे निवासी धम्मक्रांती महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील बियाणी मिलिटरी  स्कूलमध्ये दि. 17 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत हे शिबिर होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. या महाशिबिराचे नेतृत्व धम्मचारी प्रशिक्षण चमू  (भारत) करेल. बौद्ध जीवनाविषयी स्पष्टता, व्यावहारिक आचरण, तत्वज्ञान, बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत  असलेले धम्मराज्य स्थापन करण्यासाठी ध्वज वंदना, पूजा, संपर्क, सराव, गटचर्चा, प्रवचन, धम्म अभ्यासाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येईल.
या महाशिबिराचा विषय ‘स्व परिवर्तनाने विश्‍व परिवर्तन’ हा असून, 14 वर्षाखालील मुलांसाठी विशेष संस्कार वर्ग, युवक-युवती पालकांसाठी स्वतंत्र कार्यशाळाचे  आयोजनही करण्यात येणार आहे. शिबिराचे नियोजन करणे सुलभ व्हावे म्हणून भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, आरपीएफ बॅरेक येथे माहिती  कार्यालय सुरू करण्यात असून, धम्मचारी रत्नशील (उपाध्याय, त्रिरत्न बौद्ध महासंघ, भारत) हे उपस्थित राहणार आहेत. तरी, या महाशिबिरात सहभागी होऊ  इच्छिणार्‍यांनी सकाळी 10 ते 12 सायंकाळी ते या वेळेत संपर्क साधावा, असे धम्मचारी विनयरूची धम्मचारी आद्यरत्न यांनी कळविले आहे.