Breaking News

1 ऑक्टोबरपासून ’राष्ट्रवादी’ तीव्र आंदोलन छेडणार- सुप्रिया सुळे

सातारा, दि. 23, सप्टेंबर - राज्यातील भाजप सरकार हे शेतक-यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून फसवणूक करीत आहे. किती कर्जमाफी मिळणार हे अद्यापही स्पष्ट  नाही. शेतक-यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व खासदार, आमदार राज्यभर 1 ऑक्टोबरपासून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार आहेत.  असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याची केवळ गर्जना करीत आहे. मध्यावधी  निवडणुकांसाठी राष्ट्रवादी 365 दिवस तयार आहे असे विधानही त्यांनी यावेळी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्यावतीने स्त्रीभ्रूण हत्या, युवतींची छेडछाड, हुंडाविरोधी अभियान मागील काही वर्षापासून राबवले जात  आहे. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे जागर युवा संवाद कार्यक्रमानंतर खा. सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. राज्यभर मुली  असुरक्षित आहेत. कॉलेजमध्ये जाताना मुलींना भिती वाटत आहे. यासाठी मुलांची विचारधारा बदली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
राज्यातील भाजप व शिवसेना यांच्यातील राजकीय वादाबद्दल छेडले. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास राष्ट्रवादीची भुमिका काय राहिल, राष्ट्रवादी भाजपला पाठींबा  देणार का? असे प्रश्‍न केले असता, खा. सुळे म्हणाल्या, गेले तीन वर्षे शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची गर्जना करीत आहे. मात्र ते सत्तेतून काही बाहेर पडत नाहीत.  तसेच राज्यात अनेक ठिकाणी भाजप, शिवसेना विरोधात राष्ट्रवादी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपाला पाठिंबा देण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही. स्वर्गातून ब्रम्हदेव खाली आले  तरी कदापि शक्य नाही असे सांगून खा. सुळे म्हणाल्या, जर का राज्यात मध्यवधी निवडणुकांची परीस्थिती निर्माण होऊन निवडणुका लागल्या तरी राष्ट्रवादी वर्षातले  365 दिवस निवडणुकांसाठी तयार आहे.
नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात तुमच्या नावाची जोरदार चर्चा होते. या प्रश्‍नाला उत्तर देताना खा. सुळे म्हणाल्या, कोणी काही चर्चा करेल त्यावर  विश्‍वास ठेवायचा का? मी मंत्रिमंडळात समाविष्ठ होण्याबाबत विधान केले आहे का? त्यामुळे असल्या भाकड चर्चा करू नयेत. कोपर्डी घटनेसंदर्भात अद्यापही  आरोपींना शिक्षा झालेली नाही. विरोधक म्हणून राष्ट्रवादी कमी पडत आहे. यावर सुळे म्हणाल्या, कोपर्डी घटनेवर सर्वप्रथम मी आवाज उठविला आहे. कोपर्डी  बलात्काराचा कोणी राजकीय प्रश्‍न करू नका, तो सामाजिक प्रश्‍न आहे.
राज्यातील भाजप सरकारने शेतक-यांना कर्जमाफीची घोषणा केली. ऑनलाईन शेतक-यांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र किती रकमेची कर्जमाफी  होणार हे अद्यापही स्षष्ट झालेले नाही. खा. सुळे म्हणाल्या, राज्यभर पट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीची राज्यभर आंदोलने सुरू आहेत. शेतक-यांना  कर्जमाफी मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व खासदार, आमदार येत्या 1 ऑक्टोबरपासून राज्यभर आंदोलने करणार आहे, असे सुळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान  नारायण राणेंच्या काँग्रेसच्या राजीनाम्याविषयी छेडले असता, राणेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांचा आहे. त्यावर मी काय बोलणार असे सांगितले.पत्रकार परिषदेस  माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण यांची उपस्थिती होती.