Breaking News

रत्नागिरीजवळच्या झरेवाडीतील भोंदू पाटील बाबाला अटक

रत्नागिरी, दि. 22, सप्टेंबर - आपण स्वामी समर्थांचा अवतार असल्याचे सांगून भोंदूगिरी करणार्‍या रत्नागिरीतील पाटील बुवाला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली  आहे. त्याला लवकरच ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्याविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, त्याला  न्यायालयात हजर केले असता त्याला पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्त करण्यात आले आहे.
श्रीकृष्ण आनंदा पाटील ऊर्फ पाटील बुवा रत्नागिरी पोलीस दलात चालक होता. त्याच्यावर पोलिसात चालक म्हणून काम करत असतानाही भोंदूगिरीचे हे प्रकार  केल्याचे आरोप होत आहेत. पाटील याने पोलीस दलातून निवृत्ती घेऊन झरेवाडी (ता. रत्नागिरी) येथे मठ स्थापन केला आणि त्याद्वारे हा धंदा मोठ्या प्रमाणात  वाढवला. त्यासाठी त्याने आपण स्वामी समर्थांचे अवतार असल्याचेही सांगितले. गेले काही दिवस आपल्या मठात भोंदूगिरी करत होता. त्याच्या दुष्कृत्यांचा व्हिडिओ  सोशल मीडियावरही प्रसारित झाला होता. त्यामध्ये महिलांना अश्‍लील शिव्या, तसेच अनेक आक्षेपार्ह गोष्टी दिसून येतात. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने  या बुवाविरोधात कारवाई करावी, असे पत्र रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याला दिले होते. या विक्षिप्त भोंदूबाबाने महिलांबाबत केलेले अशोभनीय आणि गलिच्छ वर्तन  नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण करणारे होते. त्याला अटक करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रत्नागिरी शाखेचे जिल्हाध्यक्ष विलास कोळपे आणि  त्यांच्या सहकार्‍यांनी गेल्या मंगळवारी (दि. 19 सप्टेंबर) ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना याबाबत निवेदन देऊन या बाबावर कारवाईची मागणी केली  होती. सोशल मिडियावर प्रसारित झालेल्या व्हिडीओमध्ये हा बाबा मी विष्णूचा अवतार आहे, स्वामी समर्थांचा अवतार आहे असे विविध प्रकारचे दावे करत आहे.  मेलेल्या मुलाला जिवंत केल्याचा अवैज्ञानिक दावाही तो करताना दिसत आहे. महिलांचा उल्लेख अत्यंत अश्‍लील पद्धतीने करण्यात आला आहे. त्यामुळे या  बाबाविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत योग्य तो गुन्हा दाखल करुन बंदोबस्त करण्याची मागणी अंनिसने केली होती. दक्षसिद्धी फाऊंडेशन, मानवाधिकार संस्था,  मी रत्नागिरीकर ग्रुप आदींनीही आवाज उठवून या महाराजाच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती.
दरम्यान, प्रत्यक्ष कोणी पीडित तक्रार करण्यास पुढे येत नव्हता. मात्र आज एका पीडित महिलेने या बुवासह आणखी एका विरोधात तक्रार दिली आहे. तक्रारदार  महिलेच्या मुलास आकडीचा आजार असल्याने ही महिला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झरेवाडी (ता. रत्नागिरी) येथील पाटील बुवा यांच्या मठात गेली होती. त्यावेळी  पाटील बुवा याने तिला अश्‍लील शिविगाळ केली. याबाबत या महिलेने मठातील जयंत रावराणे यांना सांगितले. मात्र त्यांनीही दमदाटी केली. अखेर या महिलेने आज  रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आज भोंदू पाटील बुवा रत्नागिरी शहरात के. सी. जैननगर असल्याचे समजल्यानंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी त्याला  ताब्यात घेतले आणि ग्रामीण पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. मात्र त्याची पंधरा हजाराच्या जामिनावर सुटका झाली आहे.