Breaking News

काँग्रेस आणि वि.प. सदस्यत्वाचा नारायण राणे यांचा राजीनामा

सावंतवाडी, दि. 22, सप्टेंबर - काँग्रेसेचे नेते नारायण राणे यांनी आज काँग्रेस पक्षाचा आणि विधान परिषदेतील आमदारकीचा राजीनामा दिला आहे. कुडाळमध्ये  पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह सर्वच ज्येष्ठ नेत्यांवर जोरदार तोफ डागली.
अलीकडच्या काळात नारायण राणे आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या भेटींमुळे राजकीय चर्चेला उधाण आले होते. या पार्श्‍वभूमीवर ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा  रंगली होती. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आपली पुढील राजकीय वाटचाल लवकरच निश्‍चित करू, असे त्यांनी स्पष्ट केले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच  घटस्थापनेला भविष्यातील वाटचाल स्पष्ट करणार असल्याचे श्री. राणे यांनी गेल्या सोमवारी (दि. 18 सप्टेंबर) स्पष्ट केले होते. त्यामुळे आज (गुरुवारी) ते कोणती  घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज त्यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेससोबत घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले. दुपारी दोन वाजता सोनिया  गांधींना पत्र पाठविले आणि 2 वाजून 35 मिनिटांनी सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा पाठवला, असे राणे म्हणाले. काँग्रेस काय माझी काय हकालपट्टी करणार,  मीच काँग्रेस सोडतो, असे श्री. राणे यांनी सांगितले. तसेच शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही आपण रिकामे करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदाबाबत  चाचपणी करण्यासाठी त्यावेळी प्रणव मुखर्जी, अँटनी आणि दिग्विजयसिंह हे निरीक्षक म्हणून आले होते. तेव्हा 48 आमदारांनी मला पसंती दिली, तर 32  आमदारांनी अशोक चव्हाण यांना पसंती दिली होती. तरीही मला संधी देण्यात आली नाही. महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांनाच पक्ष वाढवायचा नाही. तेच पक्षातील  नेत्यांवर कुरघोड्या करत आहेत. त्यामुळे मला चारवेळा मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली. पक्षात आल्यानंतर सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचे आश्‍वासन काँग्रेसने  मला दिले होते, मात्र ते पाळले नाही, असे त्यांनी सांगितले. राज्यातील 25 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. अनेक लोक, पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. मी  नागपूरपासून सुरवात करून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. मग पुढील राजकीय निर्णय घेईन. नांदेड येथेही जाऊन अशोक चव्हाण यांना दाखवून देणार आहे  की, ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असूनही माझ्या पाठीशी त्यांच्यापेक्षा जास्त लोक आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची कोणतीही पात्रता अशोक चव्हाणांमध्ये नाही.  हवे ते मंत्रिपद मागा म्हणून मला पृथ्वीराज चव्हाण यांनी महसूल मंत्रिपद काढून घेऊन उद्योगमंत्री दिले. तेव्हाच मी राजीनामा देणार होतो. माझ्या कामाचा,  अनुभवाचा फायदा बारा वर्षांत काँग्रेसने करून घेतला नाही. विधानपरिषदेत गेलो, विरोधी पक्षनेत्याच्या बाजूला मला बसायला द्यायला हवे होते. मी सीनियर असून  गटनेता केले नाही. आता मी काँग्रेसमधून बाहेर पडलो आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातील दुकान आता बंद होणार आहे. आमदार नीतेश राणेंबाबत योग्य वेळ येईल तेव्हा  निर्णय घेऊ, असेही श्री. राणे म्हणाले.
राणे यांचा फुटबॉल झालाय असे राज ठाकरे म्हणाले होते, असे विचारता राणे म्हणाले, राज हे स्वतःच फुटबॉल आहेत. माझ्या घरात दोन आमदार आहेत. राज  ठाकरे यांच्या पक्षात एकूण आमदार एकच आहे. त्यांच्या टीकेला उत्तर द्यावे असे मला वाटत नाही. मी शिवसेनेत परत जाणार नाही असे स्पष्ट करून नारायण राणे  म्हणाले, उद्धव ठाकरे फक्त दररोज सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे देत आहेत. परंतु काही करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. दसर्‍यापूर्वी घोषणा करून  नवी दिशा स्पष्ट करणार असल्याचे श्री. राणे यांनी शेवटी स्पष्ट केले.