Breaking News

शेतकर्‍यांना समृद्धी महामार्ग भूसंपादनाचे पैसे देण्यास सुरुवात

औरंगाबाद, दि. 23, सप्टेंबर - वैजापूर तालुक्यातून जाणार्‍या मुंबई-नागपूर समृद्धीसाठी शारदीय नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर शेतकर्‍यांच्या जमिनी थेट खरेदी  प्रक्रियेद्वारे अधिग्रहणास प्रारंभ झाला. तालुक्यातील 7 शेतकर्‍यांची सुमारे 2 हेक्टर 78 आर जमीन शासनाने तब्बल पावणे दोन कोटी रुपयांत थेट खरेदी केली आहे.  नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी तालुक्यातील 15 गावांतील शेतकर्‍यांची जमीन शासन थेट खासगी वाटाघाटी करून खरेदी करणार आहे. त्यासाठी गेल्या दोन  महिन्यापूर्वी महसूल विभागाने जमीनीच्या दराची घोषणा केली होती. त्याला शेतकर्‍यांनी विरोध केला, मात्र तो काहीसा तग धरु शकला नाही. महामार्गाला जमिनी  देतांना भरघोस रक्कम मिळणार असल्याने काही शेतक-यांनी यासाठी होकार दर्शविला होता. जिल्ह्यात मागील महिन्यात महामार्गासाठी जमिनी खरेदीला प्रारंभ झाला  होता. गुरुवारी सुरु झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभदिनी खरेदीला प्रशासनाने सुरुवात केली. यात तालुक्यातील हडसपिंपळगाव येथील आशा नानासाहेब व  नानासाहेब धोंडीबा गाजरे, शोभा निवृत्ती गाजरे, पार्वती दत्तू गाजरे, कान्हू गणपत सोनवणे, विमल येडू तायडे व सुमन काशिनाथ भोपळे या सात जणांची 2 हेक्टर  78 आर जमीन देण्याची तयारी दर्शविली. या जमिनीपोटी शेतक-यांच्या खात्यात एक कोटी 74 लाख 12 हजार रुपये शासन जमा करणार आहेत. यावेळी  उपजिल्हाधिकारी नवनगरे हनुमान अरगुंडे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसीलदार सुमन मोरे, एस.जी.पोटे, तलाठी जितेंद्र चापानेरकर, महेश कदम  यांच्या उपस्थितीत दुय्यम निबंधक सी.एल.राठोड यांनी दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान जमीन खरेदीला प्रारंभ झाल्याने महामार्गातील मोठा अडथळा दूर  करण्यात प्रशासन काही अंशी यशस्वी झाले आहे.